नीलिमा किराणे या नातेसंबंधविषयक समुपदेशक आहेत. या क्षेत्रात त्या २५ वर्षांपासून काम करत असून विवाहपूर्व आणि वैवाहिक समुपदेशनाचा त्यांना उत्तम अनुभव आहे. भावनिक जागरूकतेवर भर देण्यासाठी त्यांनी विद्यार्थी, तरुण, स्त्रिया आदींसाठी कार्यशाळांच्या माध्यमातून गट समुपदेशन केले आहे. तसेच विविध संस्थांसाठी करिअर, मानसिकतेत बदल व परिणामकारक संवाद या विषयांवर व्याख्याने देणे, प्रशिक्षण कार्यक्रमांची निर्मिती करणे, या क्षेत्रात त्या सक्रिय आहेत.

‘इमोशनल क्लोजर’ हा शब्द हल्लीच्या ‘मोटिव्हेशनल कंटेंट’चा कळीचा मुद्दा आहे. अनेकदा आपल्याला अस्वस्थता, ताण, चिडचिड वाढल्याची जाणीव होत असते, त्यातून बाहेर पडण्यासाठी गरज असते ती ‘भावनिक परिपूर्ती’ची. तीच प्रक्रिया सांगणारं हे सदर दर पंधरवडयानं.

The story of Dordarshan’s iconic logo
दूरदर्शनच्या लोगोने कसे बदलले रंग? टॅगलाईन अन् चिन्हात काय बदल झालेत?
A young boy K Ayushmaan Rao dresses up as Ram Lalla
चिमुकला रामलल्ला पाहिला का? रामलल्लांच्या वेषभूषेतील रामभक्ताचा व्हिडीओ होतोय व्हायरल
Sultan Bathery -Wayanad, Kerala
विश्लेषण: भाजपाला नाव बदलायचे आहे त्या सुलतान बथेरी शहराचा इतिहास नेमका काय सांगतो?
lokmanas
लोकमानस: नेतान्याहूंची अखेरची धडपड

कधी कधी एखादा क्षुल्लक प्रसंग घडतो आणि मनाला एक अस्वस्थ टोचणी लागून राहते. ती थांबता थांबत नाही. दोन दिवसांपूर्वी डॉ. अक्षयचं असंच झालं. हॉस्पिटलमधून इमर्जन्सी कॉल आल्यामुळे तो घाईघाईनं बाईक काढून निघाला. ‘अचानक कशामुळे सीरियस झाला असेल तो रुग्ण?..’ या विचारात त्याचं सिग्नलकडे दुर्लक्ष झालं. उलटया दिशेनं येणाऱ्या वाहनांशी झिगझॅग खेळत तो कसाबसा रस्त्याला लागला मात्र, त्याच वेळी एका टोपीवाल्या मोटरसायकलवाल्यानं हासडलेली कचकचीत गावरान शिवी त्याच्या कानावर आदळली. संतापानं त्याच्या मेंदूला झिणझिण्या आल्या.

‘ओपीडी’मध्ये काम करतानाही तो प्रसंग आठवून अक्षय पुन:पुन्हा अस्वस्थ होत होता. मात्र आधीच्या रुग्णाचा केसपेपर घेऊन आपण पुढच्या रुग्णाला तपासतो आहोत हे लक्षात आल्यावर तो चमकला. मग अक्षयनं निवांत ब्रेक घेतला. आपल्या केबिनमध्ये जाऊन बसला. ‘एवढा अस्वस्थ ताण नेमका कशामुळे येतोय आपल्याला?..’ तो जाणीवपूर्वक आठवायला लागला.

‘सापडलं! ती शिवी सहन होत नाहीये. इतकी घाणेरडी शिवी? माझ्यासारख्या सिन्सिअर, कमिटेड डॉक्टरला? एवढा अपमान? तोही एका पावटयाकडून?’ अक्षय स्वत:शीच म्हणाला.

‘अरे, पण आपण एका कमिटेड, सिन्सिअर डॉक्टरला शिवी देतोय, हे त्याला कुठे माहीत होतं? त्याची शिवी एका मूर्खासारख्या सिग्नल तोडणाऱ्या घायकुत्या, बेशिस्त पोराला होती. रागाच्या भरात खटकन् आलेली प्रतिक्रिया होती ती. शिवी देताना तिच्या अर्थाचा विचार कोण करतं? तू मात्र ती शिवी स्वत:वर घेऊन तिच्या अर्थामध्ये अडकून बसलास.’ अक्षयचंच दुसरं मन म्हणालं.

‘हो! त्यानं माझा अपमान केलाय! त्यामुळे संताप होतोय. त्याच्या एक कानाखाली..’

‘आता तो माणूस कुठे सापडणार? आणि भेटला तरी ओळखता येईल का तुला?’

‘म्हणून तर हेल्पलेस वाटतंय. मी वाहतुकीचे नियम, कायम पाळतो..’ पहिलं मन ऐकायला तयार नव्हतं.

‘मान्य आहे, पण त्या दिवशी सिग्नल तोडला गेला, हे तर खरं ना? हेच जर त्या मोटरसायकलवाल्याकडून घडलं असतं, तर तूही त्याला अशीच शिवी हासडली असतीस की नाही? आताही मनातल्या मनात त्याला ‘पावटा’ म्हणतोच आहेसच! कदाचित तोही एखादा जानामाना प्रयोगशील, श्रीमंत शेतकरी असू शकतो. तूही कधी तरी चुकू शकत नाहीस का? उलट नशीब चांगलं.. अपघात झाला असता तर? मुख्य म्हणजे, आता त्या विचारात इथे रुग्ण तपासताना चुका झाल्या तर कोणाच्या कानाखाली लगावशील?’ दुसऱ्या मनानं त्याला फैलावर घेतलं आणि अक्षय भानावर आला.

‘हे मात्र खरं! क्षुल्लक प्रसंगाला ‘इगो’मानून फारच मोठं करतोय मी आणि मनाच्या बडबडीमुळे पुन्हा तेच होतंय.. समोर जे चाललंय त्याकडे दुर्लक्ष.’ अक्षयची तगमग थांबलीच एकदम. स्वत:ची चूक मान्य केल्यावर त्याचं मन एकदम हलकं झालं.

असे अनेक लहानमोठे प्रसंग, घटना आपल्या सर्वांच्या आयुष्यात घडत असतात. ‘मी प्रत्येक गोष्ट नीट, मनापासून करते-करतो, तेव्हा त्याची ना नोंद, ना कौतुक. मात्र कधी तरी एवढीशी चूक झाली की तिचं भांडवल करून मला टोमणे मारले जातात..’ अशी छोटी खंत त्यामागे वेळोवेळी असते, तसंच ‘माझ्या ऐन गरजेच्या वेळीसुद्धा कुणीही मदतीला आलं नाही,’ असे तीव्र अपेक्षाभंगदेखील असतात. काही सल, ओरखडे, सुकलेल्या किंवा भळभळत्या जखमा- त्या ओझ्यासह कायम अस्वस्थ वेदना, असहाय्यता आणि ताण असतात. काही दिवस, महिने किंवा वर्षांनुवर्ष त्यांनी मनात घरं केलेली असतात.

‘सोडून दे, मूव्ह ऑन!’ असं आपल्याला लोक सांगतात. आपल्यालाही मनापासून सुटायचं असतं, तरीही जमत नाही. कारण, ते कसं करायचं, हे माहीत नसतं. कुटुंबातल्या लोकांच्या अनुकरणातून, सिनेमा-नाटकं, वेबसीरिज पाहून, पुस्तकं वाचून आपण दुखवून घ्यायला, संतापी प्रतिक्रिया द्यायला लहानपणापासून शिकतो. माझं बरोबर, त्याचं कसं चुकलं, याबद्दलची नाटयमय स्वगतं मनात फेर धरून असतात. थोडक्यात, चक्रव्यूहात शिरायचं कसं? ते अबोध वयापासून माहीत असतं. पण त्यातून बाहेर पडायचा रस्ता, भावना ओळखून त्यावर काम करणं मात्र शिकायचं राहून जातं.

अक्षयनं केलं तसं ताण, मनस्ताप देणाऱ्या अनुभवांना ‘प्रोसेस’ करून बाहेर पडण्यासाठी मात्र मनातली बोच, सल, नेमक्या भावना ओळखता याव्या लागतात आणि छळणारे प्रश्न, पुन:पुन्हा मनात येणारे विचार, यांच्याकडे जाणीवपूर्वक पाहावं लागतं. डोक्यात ‘केमिकल लोचा’ करणारे अयोग्य प्रश्न बदलून त्यानं जेव्हा योग्य प्रश्न शोधले, तेव्हा त्या ताणातून मुक्त होणं जमलं.

एक गोष्ट पक्की समजून घ्यायची, की ज्यांना लॉजिकल उत्तर नसतं, तेच प्रश्न आपल्याला जास्त गरगरवत ठेवतात! ‘माझंच नशीब असं का?’, ‘Why Me?’ हा तर अशा प्रश्नांचा शिरोमणी. प्रत्येकाला कधी ना कधी छळणारा. कोण उत्तर देऊ शकणार असतं आपल्याला त्याचं? तेव्हा असले प्रश्नच बाजूला सरकवून ठेवून उत्तरं असलेल्या प्रश्नांना शोधावं लागतं. ते प्रश्न सापडले, की उत्तर तरी मिळतं किंवा उत्तराकडे नेणारे नवे प्रश्न मिळतात. चक्रव्यूह तोडण्याचा रस्ता सापडतो, अडकलेपणाची घुसमट संपते.

या सदरामध्ये, अशा गरगरत ठेवणाऱ्या विषयांवरचे ‘उत्तर असलेले प्रश्न’ कसे शोधायचे? भावना आणि विचारांचं नातं कसं असतं? हे समजून घेत, विचारांच्या ‘लॉजिकल एंड’मधून, अर्थात विचारांचा तर्कसुसंगत मार्ग धरून ‘भावनिक पूर्णत्वा’पर्यंत (इमोशनल क्लोजर) कसं पोहोचता येईल? याकडे प्रत्यक्ष अनुभवातून बघणार आहोत. जागच्या जागीच गरगरण्यात जाणारा वेळ वाचवून सहज आनंदाकडे जाणारा मार्ग शोधणार आहोत. तुम्हीही व्हा या प्रवासात सामील.

neelima.kirane1@gmail.com