भययोग..

समाजात सर्वच क्षेत्रांत आज किती वेगानं हा भय-योग पसरवला जात आहे.

समाजात सर्वच क्षेत्रांत आज किती वेगानं हा भय-योग पसरवला जात आहे. भीतीच्या या भांडवलावर धर्माच्याच नव्हे, तर अध्यात्मासारख्या शुद्ध मार्गाच्याही बाजारुकरणाचे प्रयत्न किती वेगात सुरू आहेत. अध्यात्म म्हणजे खुळचटपणा नव्हे, वेडाचार नव्हे. कशाची तरी भीती घालून संख्यात्मक बळ वाढवत राहणं नव्हे. अध्यात्म हे आत्मिक बळ वाढविणारं आहे. असलेलं आंतरिक बळ खच्ची करणारं नव्हे.

‘‘मी आलोच हं..’’ जीत असं म्हणाला आणि चटकन घरात गेला.. आत्ता आम्ही त्याच्या खोलीतून चहा घेऊन बाहेर पडलो होतो. ‘‘दोन-तीन तासांत आलोच,’’ असं सांगून त्यानं बायकोचा निरोपही घेतला होता.. पण विसरला असेल काही तरी, असा विचार करून मी त्याच्या चाळीच्या व्हरांडय़ात थांबलो.. पाचेक मिनिटांत तो घाईघाईत आला. मग मजल्यावर टांगलेल्या देवी-देवतांच्या तसबिरींनाही मनोभावे हात जोडून झाला. मग आम्ही निघालो.

जीत हा तरुण तसा एकदम धडाडीचा. आयुष्याची फारशी चिंता न वाहणारा आणि सगळा भार अक्कलकोट स्वामी वाहात आहेत, असं अगदी लहानपणापासून मानणारा. रस्त्यानं बोलत निघालो की वाटेत लागणाऱ्या प्रत्येक लहान-मोठय़ा मंदिराकडे पाहत त्याचे हात जोडले जात. पण अनेकांना अशी सवय असते, त्यात काय मोठंसं, या भावनेनं मला त्याच्या त्या कृतीत काही खटकतही नसे. काही दिवसांनी मात्र मला का कोण जाणे त्याचं ते नमस्कार करणं थोडं वेगळं वाटू लागलं. त्याच्या घरी काही कामानिमित्त एका आठवडय़ात दोन-तीनदा जाणं झालं. त्या प्रत्येक वेळी मला सोडायला म्हणून तो निघायचा आणि दरवेळी व्हरांडय़ात आलो की, ‘‘थांबा हं आलोच,’’ असं म्हणून पुन्हा घरात जायचा. पाचेक मिनिटांत परतायचा तरी चेहऱ्यावर काही तरी राहून गेल्याच्या भावनेचे कवडसे जाणवायचे. आता रस्त्यानं जाताना मंदिरांकडे पाहून हात जोडणं तर होतंच, पण वाटेतल्या दुकानांत मालकांनी लावलेल्या देवांच्या तसबिरींनाही तो हात जोडतोय, अशी जाणीव झाली तेव्हा मला राहवलं नाही. पुढच्या वेळी तो असाच घरातून निघाल्यावर, ‘‘आलोच हं,’’ असं म्हणून घरात गेला तेव्हा मीही त्याच्या नकळत त्याच्या मागे गेलो. पाहिलं तर तो आतल्या खोलीत गेला होता. घरात कुणीच नव्हतं. आतून कसलाही आवाज येत नव्हता. पाचेक मिनिटांनी तो त्या खोलीच्या दाराबाहेर पडला. दाराला नमस्कार करून मागे वळला तोवर मी अलगद पुन्हा व्हरांडय़ात जाऊन उभा होतो. पुढच्या खेपेला मी त्याच्या घरी गेल्यावर सहज म्हणालो, ‘‘इतक्यांदा तुझ्याकडे आलो, पण घर काही पूर्ण पाहिलं नाही बघ.’’

‘‘त्यात काय आहे पाहण्यासारखं. लहानसं तर घर आहे. याच मजल्यावर आई-वडील राहातात म्हणून आमचं स्वयंपाकघर एकच आहे. त्यामुळे आतली खोली जादा झाल्ये!’’ तो म्हणाला.

‘‘बरं..’’ असं म्हणत मी त्या आतल्या खोलीत शिरलोच. दिवा लावला आणि पाहिलं देव-देवतांच्या अनेक तसबिरी भिंतीवर होत्याच, पण पुस्तकांच्या शेल्फमध्येही पुठ्ठय़ावर चिकटवलेली देव-देवतांची काही चित्रं मांडल्यागत ठेवली होती. मी त्याच खोलीत बसून राहिलो. त्याला म्हटलं, ‘‘सगळं आवरून घे, मग निघू.’’

तो अवघडून म्हणाला, ‘‘सगळं आवरलंच आहे. तुम्ही बाहेर थांबा. मी आलोच.’’

मी म्हणालो, ‘‘थांबू कशाला. एकदमच निघू.’’

त्याला काय बोलावं सुचेना. मग मीच म्हणालो, ‘‘बरं थांबतो मी बाहेर. ये तू.’’

दोन दिवसांनी मला भेटला तेव्हा चेहऱ्यावर ‘सांगावं की सांगू नये’ असे भाव होते.

मीच विचारलं, ‘‘काही सांगायचंय का?’’

तो थोडं अवघडून म्हणाला, ‘‘तसं काही विशेष नाही, पण मला अलीकडे काय होतंय तेच समजत नाही.’’

‘‘म्हणजे?’’ मी विचारलं.

‘‘मला अलीकडे देवाला नमस्कार करण्याची सवय जडल्ये.’’ तो म्हणाला.

‘‘मग त्यात काय बिघडलं? श्रद्धा असेल तर जरूर करावा, नसेल तर करू नये..’’ मी मुद्दामच त्याच्या सांगण्यात फारसं तथ्य वाटत नसल्याचं भासवत उत्तरलो.

तो अजूनच अस्वस्थपणे म्हणाला, ‘‘तसं नाही.. पूर्वी मी फक्त स्वामींच्या फोटोला नमस्कार करीत असे. आता प्रत्येक तसबिरीला हात जोडतो. बरं तोही एकदा नाही अनेकदा. तरी मनात भीती असते की मी सगळ्या तसबिरींना हात जोडला की नाही? कुणी राहिलं तर नसेल ना? राहिलं असेल तर त्यांना राग येईल का? त्यांचा कोप होईल का? असं वाटून मग मी परत सगळ्यांना नमस्कार करतो.’’

मी म्हणालो, ‘‘हात जोडला नाही म्हणून जर कुणा देवाला राग येत असेल, तर तो देव नाही माणूसच आहे! मान-अपमानाच्या क्षुद्र कल्पना माणसाला असतात देवाला नव्हेत. तुम्ही हात जोडा की न जोडा त्याची कृपा, त्याचं प्रेम सतत सर्वत्र एकसमानच आहे. तू नमस्कार कर, मगच मी तुझ्याकडे लक्ष देते असं आई मुलाला म्हणत नाही की देवही!’’

हे उत्तर त्याला अनपेक्षित असावं आणि ऐकायला तसंच पचायलाही कठीण असावं. तो म्हणाला, ‘‘मीही मनाची समजूत घालायचो की नमस्कार केलाच आहे आपण, पण मग आयुष्यात काही अडचण आली की वाटायचं आपण नीट हात जोडले नसतील म्हणून हे झालं.’’

‘‘अरे पण आयुष्य अडचणींशिवाय असतं का कधी? तू हात जोडल्यानंतर अडचणी आल्याच नाहीत असंही नाही ना झालं कधी? मग ते का लक्षात ठेवत नाहीस? रामकृष्णादी देवांचं आयुष्यही संकटमय, संघर्षमय नव्हतं का? तुकाराम महाराजांच्या आयुष्यात संकटं, मानहानी नव्हती का? तेव्हा संकटं असणारच, अडचणी असणारच आणि त्यांनी आम्ही घाबरणार हेदेखील मनुष्य स्वभावानुसार स्वाभाविकच आहे. पण त्यांचा संबंध हात जोडण्याशी लावायचा? साध्या हात जोडण्यानं त्या देवानं परीक्षेतलं अपयश, लहान-मोठं आजारपण, पैशाची हानी ही सगळी संकटं नेहमीच दूर करीत जावं, असं मानणं हा वेडगळपणा नाही का? त्या संकटांशी झुंजण्याची शक्ती त्यानंच दिली आहे ना? मग त्या शक्तीचा वापर करीत संकटांना सामोरं जाऊ  आणि ती शक्ती दिल्याची कृतज्ञता म्हणून त्याला वाटलं तर हात जोडू!’’

वाचलेल्या एका गोष्टीचा वापर करायचं मग ठरवलं. श्रावण सुरू झाला होता. त्यानं आग्रह केला की काही तासांच्या अंतरावर एक प्राचीन शिवमंदिर आहे. तिथं दर्शनाला जाऊ. आता धर्मश्रद्धेला वळण लावून माणसाला अध्यात्माच्या वाटेवर जाण्याची प्रेरणा देण्यात मंदिरं मोठी भूमिका बजावू शकतात हे खरं. त्यामुळे मंदिरांचं महत्त्व मला मान्य असलं तरी मी मंदिरांत सहसा जात नाही, हे त्याला माहीत होतं. तरी त्यानं आग्रह केला आणि आम्ही गेलो. गाभाऱ्यातल्या शिवलिंगाला त्यानं मनोभावे नमस्कार केला. आम्ही बसलो क्षणभर.

मी त्याला म्हणालो, ‘‘चल लवकर मला इथं भीती वाटते..’’

त्यानं आश्चर्यानं विचारलं, ‘‘कसली भीती?’’

‘‘त्या सापांची’’, मी हळूच म्हणालो. दगडी शिवलिंगावर दगडातच कोरलेला फणाधारी नाग पाहात तो हसून म्हणाला, ‘‘गंमत करता का? अहो तो दगडी साप आहे.’’ मी गंभीरपणे म्हणालो, ‘‘आणि ते शिवलिंगही दगडीच आहे ना? पण ते खरं भासून श्रद्धा जागी होते, तर तो सापही खरा वाटून भीती जागी का नाही होणार? याचाच अर्थ भीती जागी करायची की श्रद्धा याचा निर्णय आपल्याच हाती आहे. देवांच्या तसबिरी पाहून श्रद्धा जागी होणं समजू शकतं. पण भीती जागी होत असेल तर काहीतरी आकलनातच चूक आहे हे समजून घेतलं पाहिजे.’’

ही भीती काढण्यासाठी हवं तर उत्तम मानसोपचारतज्ज्ञाकडे जा, पण भक्ती आणि भीती एकत्र पोसू नकोस, असं मी त्याला कळकळीनं सांगितलं. पण मला वाटलं की असे अगणित ‘जीत’ तुमच्या-आमच्यातही आहेतच की! समाजात सर्वच क्षेत्रात आज किती वेगानं हा भय-योग पसरवला जात आहे. भीतीच्या या भांडवलावर धर्माच्याच नव्हे, तर अध्यात्मासारख्या शुद्ध मार्गाच्याही बाजारुकरणाचे प्रयत्न किती वेगात सुरू आहेत. ‘अमक्या काळात जगबुडी होणार आहे आणि तेव्हा आमच्या गुरूचेच भक्त वाचणार आहेत,’ असा प्रचार एक-दोन संघटनांनी मागे केला होता. त्या प्रलयातून वाचण्यासाठी एका संघटनेने ‘कवच’ म्हणून खिशाला लावायचे बिल्ले विकले आहेत. प्रलयाआधीच त्यातले काही तुटलेही आहेत! दुसरी संघटना तर देशव्यापी. त्यांनी थेट काही वर्षांनंतरची प्रलयाची तारीखसुद्धा घोषित करून टाकली होती. तेवढय़ा वर्षांत भेदरलेले अनेक ‘भक्त’ मिळाले. वर्षांमागून र्वष उलटली. प्रलयाचा ‘तो’ दिवस उगवला आणि मावळलाही. त्या दिवशी टिपूसभरही पाऊस पडला नाही, जग बुडविणाऱ्या प्रलयाची गोष्टच सोडा. ओळखीतल्या एकानं त्यांच्या भक्ताला प्रलय न झाल्याबद्दल छेडलं, तर तो मोठय़ा तोऱ्यात म्हणाला, ‘‘प्रलय येणारच होता. आमच्या गुरूनं योगबळानं तो रोखलाय. आता पाच वर्षांनी मात्र प्रलय येणारच आहे!’’

म्हणजे प्रलयाचीही ‘तारीख पे तारीख’ आहेच आणि त्यायोगे भक्तांचा लोंढाही आहे!

अध्यात्म म्हणजे खुळचटपणा नव्हे. वेडाचार नव्हे. कशाची तरी भीती घालून संख्यात्मक बळ वाढवत राहणं नव्हे. अध्यात्म हे आत्मिक बळ वाढविणारं आहे. असलेलं आंतरिक बळ खच्ची करणारं नव्हे. काही जण मग म्हणतात की, भीतीचं दुसरं टोक आहे बेफिकिरी. काही जण गुरूवर सर्व भार सोडून बेफिकीर होतात. हेसुद्धा भीतीइतकंच वाईट नाही का? तर इथं गुरू सच्चा आहे का, हेच निर्णायक ठरणारं आहे. एकानं एका शास्त्रज्ञाची ओळख करून दिली. तिथून निघाल्यावर म्हणाला, ‘‘यांचे एक गुरू आहेत. त्यांना विचारल्याशिवाय घरातलं पानही हलत नाही. यांनी एक वेळ घरात देवांची पूजाअर्चा केली तरी काही वाटणार नाही. पण माणसावर असा भरवसा टाकणं हा वेडेपणाच आहे.’’

मी म्हणालो, ‘‘जर कागदी तसबिरीवर किंवा दगडी मूर्तीवर विश्वास टाकायला तुमची हरकत नाही, मग त्या देवत्वाच्या स्पर्शानं जो व्याप्त असेल त्याचं सांगणं ऐकणं काय चुकीचं आहे? कुणाही सोम्यागोम्या माणसाचं ऐकू नये, हे खरंच, पण ज्याचं ऐकल्यानं मनातला आणि कृतीतला गोंधळ दूर होत असल्याचं अनुभवानं दिसत असेल तर त्याचं का ऐकू नये? जगात अनेक शैक्षणिक ग्रंथ आहेत, संगणकावरूनही तुम्ही अनेक ग्रंथ वाचू शकता तरी शाळा-महाविद्यालयं, शिक्षक-प्राध्यापक लागतातच ना? त्यांचं आपण ऐकतोच ना? साधी लौकिकातली विद्या शिकायलाही गुरू लागतो, तर ‘मी’पणाच्या दलदलीतून आपल्याला बाहेर पडण्याची कला शिकवणारा गुरू अनिवार्य नाही? तो निवडताना एकच पाहावं की, तो भीती दाखवून आपला झेंडा रोवू पाहातोय की त्या भीतीवर मात करणारी आंतरिक शक्ती जागवून ‘मी’पणाचे सगळे झेंडे तोडून टाकू पाहातोय? खरं अध्यात्म माणसाला निर्भयतेची कला शिकवत व्यापक करतं. उलट भीती हे ज्या पंथाचं भांडवल असतं त्या पंथाला भीती टिकवण्यात आणि वाढवण्यातच रस असतो.. निर्भयतेत नव्हे!

चैतन्य प्रेम

chaitanyprem@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व विचार पारंब्या बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Marathi articles on fear in spirituality

ताज्या बातम्या