– चंद्रमोहन कुलकर्णी

‘ग्राफिक नॉव्हेल’ या संकल्पनेचा विचार करताना आपल्याला आधी ती संकल्पना नीट समजून घ्यायला हवी. विशेषत: मराठी भाषेत किंवा मराठी भाषेतून प्रकाशित होणाऱ्या ‘ग्राफिक नॉव्हेल’चा विचार आपण जेव्हा करतो; तेव्हा संपूर्ण रूपसंकल्पनाच बदलून ती आपल्यासमोर आलेली दिसते. वास्तविक, ग्राफिक नॉव्हेलमध्ये असं अपेक्षित आहे की, एखादं असं कथानक- ज्याच्यात शब्दांच्या खेळापेक्षा किंवा शब्दार्थापेक्षा दृश्यार्थाची पेशकश जास्त प्रभावीपणे मांडण्यास बराच वाव असेल. कथेतल्या एखाद्या घटनाप्रसंगाची चित्रकाराच्या नजरेतनं सादर केलेली मांडणी इथे महत्त्वाची मानली जाते. इथे शब्द येतात ते कथेचा ओघ कायम ठेवण्यासाठी. कथेचा प्रवाह पुढे नेण्यासाठी. संवादासाठी आणि अपरिहार्य अशा शाब्दिक वर्णनासाठी. चित्रांमधल्या जागा शब्दांनी भरून काढाव्यात आणि शब्दांना पुढं न्यावं चित्रांनी. लेखकाचे शब्द तोलूनमापून चित्रकाराच्या पुढ्यात ठेवणं हे साक्षेपी संपादकाचं काम.

दृश्यरूपातनं कथा सांगण्याच्या प्रवासातल्या खुणा भारतीय लघुचित्रशैलीमध्ये किंवा पोथ्यांच्या हस्तलिखितांमधूनही सापडतात. अगदी रामायणासारख्या मोठमोठ्या कथाकाव्यांचीसुद्धा दृश्यरूपं पोथ्यापुरांणांमधून सापडतात. एक प्रकारच्या ग्राफिक नॉव्हेल्सच या!

हेही वाचा – केवळ योगायोग…!

छपाईचा शोध लागल्यापासून देशोदेशी या प्रकारच्या पुस्तकांमधे मोठी भर पडली. अलीकडच्या काळात वर्तमानपत्रांमधून आणि नियतकालिकांमधून प्रसिद्ध होणाऱ्या कॉमिक स्ट्रिप्सचं ग्राफिक नॉव्हेल हे विस्तारित रूपच. इंग्रजी आणि इतर भारतीय भाषांमध्ये ऐतिहासिक, पौराणिक आणि इतर प्रकारची अनेक कथानकं असलेली पुष्कळ पुस्तकं आज बाजारात विपुल प्रमाणात उपलब्ध आहेत. कथेतल्या प्रसंगांवर आधारित निरनिराळ्या कोनांतून रेखाटलेली पूर्ण किंवा अर्धे पान चित्रं, पात्रांच्या मुखी दिलेले ढगांच्या आकारात ठरावीक टायपोग्राफीमध्ये बसवलेलं, सोबत थोडंसं शाब्दिक वर्णन असा ऐवज असलेली कॉमिक्स आज आपल्याला विपुल प्रमाणात पाहायला मिळतात. मुळात इंग्रजी किंवा इतर भारतीय भाषांमधून लिहिली गेलेली आणि मराठीमध्ये भाषांतर होऊन आलेलीसुद्धा पुष्कळ कॉमिक्स पाहायला मिळतात. आपण ज्या प्रकारच्या पुस्तकांना आता ‘ग्राफिक नॉव्हेल’ म्हणतो आहोत, ते एक प्रकारे या कॉमिकबुकचंच एक विस्तारित रूप आहे असं मला वाटतं. मराठीत येताना मग हा सगळाच प्रकार सपाट आणि उपरा होऊन येतो. ग्राफिक नॉव्हेलसाठी उपयोगात आणल्या जाणाऱ्या चित्रशैलीचीसुद्धा एक पद्धत जवळजवळ ठरून गेली आहे. हुबेहूब पद्धतीची वास्तववादी रेखाटनं, मानवाकृतींच्या रेखाटनांसाठी वापरात असलेले किंवा लोकप्रिय असलेले विशिष्ट प्रकारचे चित्रकारांचे आवडते लाडके अँगल्स, त्याच त्याच पद्धतीच्या चित्रचौकटी, विशिष्ट प्रकारच्या बॉर्डर्स आणि ठरावीक दृश्यमांडणी असं एकूण ढोबळमानानं त्याचं स्वरूप दिसतं. अर्थातच यापलीकडे जाऊन वेगळी वाट चोखाळणारी मंडळी निश्चितच चांगलं काम करत आहेत, पण माझ्या मायमराठीच्या वाट्याला अजून तरी तसा काही विशेष उल्लेखनीय असा लाभ झालेला नाही.

काही प्रयोगशील मंडळी नवे प्रयोग करत आहेत, पण व्यावहारिक आडचणींपोटी मुख्य प्रवाहातला मराठी प्रकाशक असे प्रयोग करायला अजूनही कचरतोच आहे. मुळातूनच मराठी लेखकांनी लिहिलेली चांगली निर्मितीमूल्य असलेली ग्राफिक नॉव्हेल वाचायला, पाहायला मिळणं ही आज मराठी मुलांसाठी आणि मोठ्यांसाठीसुद्धा दुर्मीळ गोष्ट आहे. ‘ग्राफिक’ आणि ‘नॉव्हेल’ हे दोनही शब्द मिळून होणारा अर्थ वेगळा आहे, जास्त विस्तृत आहे. आज ही संकल्पना पुस्तक रूपानं येताना त्या संकल्पनांचा अर्थ बराच संकुचित स्वरूपात किंवा ढोबळ स्वरूपात हाती येताना दिसतो. मराठीमध्ये अजून अशा प्रकारच्या पुस्तकांना तितकासा वाचक नाही, असा एकूणच याबाबतीत सूर आहे. त्याची कारणंही अनेक आहेत. ग्राफिक नॉव्हेल निर्माण करताना लेखकाबरोबरच चांगल्या संपादकाचीही निवड करणं आवश्यक असतं. कथालेखकाच्या मूळ लिखाणातून संवादासाठीचे नेमके मोजके चपखल शब्द निवडून त्यांचं संपादन करून चित्रकाराच्या हाती देणं हे महत्त्वाचं काम आहे. आशयाची जाण असलेला आणि आपल्या चित्र काढण्याच्या कामात निष्णात असलेला चित्रकार निवडणं आणि सगळी मिळून ही मोट बांधणं हे प्रकाशकाच्या दृष्टीनं अवघड काम आहे.

सर्वप्रथम लेखक, उत्तम संवेदनशील संपादक आणि साहित्याची समज असलेला निष्णात चित्रकार निवडून उत्तम निर्मितीमूल्य सांभाळत एक छानसं पुस्तक वाचकांच्या हाती देणं हे कार्य खरोखरीच अवघड तर आहेच, पण तितकंच ते खर्चिकही आहे. प्रकाशकांची खर्चाबाबतची ही तक्रार बिलकुल रास्त आहे. पण अशी निर्मितीमूल्य असलेली पुस्तकं (भले ती महाग का असेनात) आपण मुलांच्या हाती केव्हा देणार? असा प्रश्न मराठी पालकांनी स्वत:लाच विचारणं योग्य ठरेल. महागडी खेळणी, महाग खाऊ, अधिकाधिक शुल्क असलेली शाळा, महाग कपडे, मोठा प्रवासखर्च, महाग ट्युशन याच्यामध्ये ‘महाग पुस्तके’ या आणखी एका महाग गोष्टीची भर पडली तर निदान पुढच्या काळामध्ये केवळ चांगली पुस्तकं न वाचल्यामुळे आणि न पाहिल्यामुळे ही मुलं बौद्धिकदृष्ट्या कुपोषित राहणार नाहीत, एवढी तरी खात्री आज देता येईल. पुस्तकाची निर्मितीमूल्यं हा मुद्दा फक्त ग्राफिक नॉव्हेल या प्रकारापुरताच संबंधित आहे असं नाही, मुलांसाठी असलेलं कोणतंही पुस्तक असो, कथा असो की कविता, बडबडगीत असो की कादंबरी, विज्ञानकथा असो की गूढ-भयकथा असो, संपूर्ण पिक्चरबुक असो, शब्दविरहित नुसत्या चित्रांचं पुस्तक असो, रंगीत असो वा नुसत्या काळ्या शाईतली रेखाटनं असोत, उत्तम निर्मितीमूल्य असलेलं मुलांसाठीचं कोणतंही पुस्तक प्रकाशित करण्यासाठी एरवीच्या म्हणजे प्रौढ वाचकांसाठी असलेल्या पुस्तकांपेक्षा जास्त खर्च येतो. पालकांनी आपल्या मुलांच्या चांगल्या भवितव्यासाठी हा खर्च केलाच पाहिजे. इतकंच नव्हे, तर मल्टिमीडिया, समाजमाध्यमांचं आक्रमण, मोबाइल गेम्स, एआयसारख्या तंत्रज्ञानामुळे मुलांच्या पुढ्यात येऊन आदळणारा माहितीचा धबधबा या सगळ्या गोष्टींपासून जर आपल्या मुलांना वाचवायचं असेल तर मुलांच्या हाती चांगली पुस्तकं देणं एवढंच आपल्या हातात आहे. सुदैवानं मराठीमध्ये फार चांगलं लिखाण झालेलं आहे, होत आहे. ग्राफिक नॉव्हेलकडे ठरावीक चौकटीपलीकडून पाहिलं तर मराठीतलं जे चांगलं वाङ्मय आशयघन चित्रांसहित उच्चनिर्मतीमूल्यांसह वाचकांच्या हाती देण्याच्या कितीतरी शक्यता आहेत.

जाता जाता पण महत्त्वाचं म्हणजे बालवाङ्मयासाठी चित्रनिर्मिती करणं, ही एक महत्त्वाची आणि विशेष गोष्ट आहे. एकूणच साहित्याबरोबर चित्रकलेच्या संदर्भात काम करणं, मुखपृष्ठ करणं, कथा-कवितांसाठी चित्र काढणं, चांगली टायपोग्राफी, चांगली कॅलिग्राफी, पुस्तकातल्या मजकुराची संवेदनशील आणि कलात्मक मांडणी या चित्रकलेतल्या जगातल्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. कलामहाविद्यालयांमधून दुर्दैवानं कथा-कविता-कादंबऱ्यांसाठी चित्र काढणं किंवा एकूणच चित्रकारानं साहित्यकृतींसमवेत काम करणं या गोष्टीकडे अक्षम्य दुर्लक्ष झालेलं आहे. तिथे हा विषय शिकवलाच जात नाही. या विषयावरची एखादी ‘असाइन्मेंट’ करून घेतली जात असेलही, विद्यार्थ्यांच्या हातात वर्षातून एखादी कथा-कविता दिली जातही असेल, पण चित्रकार म्हणून या विषयात संपूर्ण करिअरच्या करिअर घडवता येऊ शकतं आणि ते उत्तम घडवता येऊ शकतं या गोष्टीचा विचार कलामहाविद्यालयातून होतानाच दिसत नाही.

हेही वाचा – आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : माणसं आणि काळाचे दस्तावेजीकरण

व्यंगचित्रकलेच्या शिक्षणाबाबतही कलामहाविद्यालयातून अक्षम्य हेळसांड होत आहे. हाही विषय तिथे शिकवला जात नाही. जगाच्या पाठीवर मोठमोठ्या कलावंतांनी हे विषय फार समर्थपणे हाताळले. असं असूनही कलाशिक्षणामध्ये या विषयांचं पूर्ण ज्ञान मिळवण्यासंबंधी खडखडाट असावा, यापेक्षा कलाक्षेत्राचं दुर्दैव ते कोणतं?

शालेय शिक्षणामध्ये चित्रकलेकडे होत आलेलं दुर्लक्ष आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे आणि कलामहाविद्यालयांमध्ये ही अवस्था! कसे निर्माण होणार आमच्याकडे स्वत:चा स्वतंत्र विचार करणारे आणि तो विचार संवेदनशीलतेनं मांडणारे चित्रकार? आणि कशी निर्माण होणार उत्तम निर्मितीमूल्य असलेली मुला-मोठ्यांसाठी बहारदार पुस्तकं?

संगणकासमोर बसून आर्टिफिशीयल इंटेलिजन्सला कितीही लांबलचक आणि वर्णनात्मक प्रॉम्प्टिंग केलं तरीही, खरी आणि विचारपूर्वक काढलेली चित्रं आपण आणणार कुठून? त्यासाठी विचार करावा लागतो. आणि विचार करण्यासाठी वाचावं लागतं.

chandramohan.kulkarni@gmail.com