‘डॉक्टरांच्या जगात’ वावरताना प्रत्येक डॉक्टरला अनेकविध अनुभव येतात. त्यातील भावभावनांचे चढउतार, मनुष्यस्वभावातली विविधता यातून एकंदरीत समाजमनाचा आरसाच पुढे येत असतो. त्याच्या समृद्ध अनुभवविश्वात रुग्ण, रुग्णाचे नातेवाईक, हाताखालचे कर्मचारी, ज्येष्ठ व कनिष्ठ सहकारी, समाजाचे इतर घटक वगरेंशी होणाऱ्या मनोव्यापाराचं निखळ प्रतिबिंब असतं. काही अनुभव हसवणारे, काही रडवणारे, काही आश्चर्यकारक, काही खेदजनक तर काही चिंतनीय!
परवा एका वैद्यकीय महाविद्यालयातील एक खळबळजनक घटना समजली. एम.बी.बी.एस.च्या तिसऱ्या वर्षांत शिकणारा २१ वर्षीय तरुण मुलगा व त्याचे तीन-चार मित्र रात्री जेवणासाठी वसतिगृहातून बाहेर गेले. त्यांचे जेवणानंतर मद्यपान सुरू झाले. त्या तरुणाने जरा जास्तच घेतली. वेळेच्या आत पोहोचायचे म्हणून घाईघाईने नंतर दोघा मित्रांच्या खांद्यांवर हात टाकून त्याला वसतिगृहात आणून कसेबसे झोपवण्यात आले. थोडय़ाच वेळात तो मुलगा बेशुद्ध पडून त्याच्या तोंडातून फेस येऊ लागला. हे लक्षात आल्यावर, हे प्रकरण आपल्यावरच उलटेल म्हणून कोणी ‘मित्र’ त्याला त्याच आवारात व स्वत: शिक्षण घेत असलेल्या रुग्णालयात घेऊन गेले नाहीत. थोडय़ा वेळाने त्याला उठवायचा प्रयत्न केला, मात्र तो उठत नाही हे पाहून आपापल्या खोलीत निघून गेले. ही गोष्ट रात्री तीनच्या सुमारास गस्त घालणाऱ्या सुरक्षारक्षकाच्या लक्षात आली व त्याने बळजबरीने त्या बेशुद्ध मुलाला रुग्णालयात न्यायला लावले. गंभीर परिस्थितल्या त्याला उपचार करून वाचविण्यात आले.  ही गोष्ट रेक्टर सरांच्या कानावर जाताच ते पहाटे तातडीने तिथे पोहोचले. रुग्ण मुलाच्या बरोबर असलेल्या तीन-चार मित्रांवर त्यांनी संतापाच्या भरात हात उगारला. दुसऱ्या दिवशी महाविद्यालयातील सर्व मुलांची एक तातडीने सभा घेण्यात आली, त्यात डीन सरांनी विचार मांडले, ‘‘विद्यार्थी मित्रांनो, येथून डॉक्टर म्हणून शिकणारे प्रत्येक विद्यार्थी आमच्या कुटुंबाचे घटक आहेत. अशी घटना आपल्या कुटुंबात घडू नये ही जशी आईवडिलांची इच्छा असते तशीच आमचीही प्रामाणिक इच्छा आहे. तुमच्या प्रत्येक अडचणीसाठी आमचे दरवाजे उघडे असतात, पण अयोग्य गोष्ट वेळेवर न थांबवता ‘मला काय त्याचे?’ या वृत्तीने दडपून टाकणाऱ्यांना ‘मित्र’ या शब्दातील आपुलकी समजली नाही असे मी समजतो व या गोष्टीचे मला अधिक वाईट वाटते आहे. ही त्या मुलाची वैयक्तिक बाब नसून आमच्या महाविद्यालयाची कौटुंबिक बाब आहे असे मी मानतो.’ रेक्टर सरांनी त्यांच्या इंटर्नशिपच्या काळातील अशीच एक घटना मुलांना सांगितली. एकदा काही घरगुती कारणाने ते मित्रांबरोबर सहलीला जाऊ शकले नव्हते. दुर्दैवाने त्याच दिवशी त्यांचा जिवलग मित्र इतर मुलांच्या नादाने दारू प्यायला व त्याचा तलावात बुडून मृत्यू झाला. त्याच्या अंत्यविधीच्या वेळेस त्या मुलाची आई रडत रडत त्यांना म्हणाली होती, ‘बाळा, आज तू जर त्याच्याबरोबर गेला असतास तर ही घटना झालीच नसती.’ केवढा विश्वास त्या माऊलीच्या मनात मुलाच्या या मित्राबद्दल वाटत होता! या वाक्याने त्यांच्या मनाला झालेली जखम ते अजून विसरू शकले नव्हते. म्हणूनच भावनावेगाने त्या रात्री मुलांवर उगारलेला हात- आज त्यांनी समुपदेशनासाठी, मैत्रीसाठी मुलांसमोर पुढे केला होता व व्यथित झालेलं मन तेवढय़ाच संवेदन क्षमतेने परिस्थिती हाताळत होतं. २-३ दिवसांनी त्या रुग्ण मुलालादेखील वेगळे बोलावून समज दिली गेली.
‘मला काय त्याचे?’ ही अप्पलपोटी स्वार्थी वृत्ती जर मैत्रीच्या नात्यात डोकावू लागली; तर त्या नात्यात विश्वास, जिव्हाळा कसा रुजेल? स्वत:बद्दलच्या अवाजवी कल्पना, व्यक्तिस्वातंत्र्याचे लावलेले सोयिस्कर अर्थ, स्पर्धा परीक्षांचे अति ताण, आईवडिलांशी तुटक, वरवरचा संवाद, ताण घालवणाऱ्या मनोरंजनाची सवंग पातळी, मत्रीतही वैचारिक खोलीचा अभाव यातून या अप्रस्तुत घटना घडत असाव्यात.
माणसांच्या याच स्वभावाचे आम्हालाही विलक्षण अनुभव येतात. त्यांची हक्कवसुलीची, नियमबाह्य़ हव्यासाची ही एक घटना! मेडिक्लेम पॉलिसी काढल्यानंतर त्याच्या कॅशलेस प्रकाराने जर रुग्ण कंपनीकडून पैसे मिळवू इच्छित असेल, तर प्रथम डॉक्टरांकडे आल्यावर प्रतीक्षा कक्षातील नोंदणी विभागापासूनच कॅशलेसचे कार्ड नाचवत काही रुग्ण दादागिरीने संभाषण सुरू करतात. डॉक्टरांकडून तपासून, मग आजाराला आवश्यक असेल तरच रुग्णालयात दाखल करून, रोगनिदानाच्या खातरजमेसाठी आवश्यक त्या तपासण्या करून त्यांचे रिपोर्ट जेव्हा कॅशलेसच्या फॉर्मबरोबर विमा कंपनीकडे फॅक्स केले जातात तेव्हा तेथील नियोजित डॉक्टर्स या केसची छाननी करून, कॅशलेस सुविधा देता येईल की नाही हे ठरवितात व संबंधित रुग्णालयाला त्याप्रमाणे उत्तराचा फॅक्स करतात. एकदा त्यांचा होकार आल्यावर पुढील सर्व खर्च रुग्णालय करते व त्या संदर्भात झालेल्या तपासणी चाचण्यांचे पसेही सोनोग्राफी, एक्स-रे, रक्तचाचण्या करणाऱ्या डॉक्टरांना देते. पण कंपनीकडून हे मान्यतेचे पत्र येईपर्यंत जो खर्च होतो तो रुग्णाला तात्पुरता करावा लागतो. त्याचे पसे त्याला डिस्चार्ज नंतर परत केले जातात, पण ही प्रक्रिया समजून न घेता उलट ते समजावून सांगणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच अरेरावीने दरडावणारे रुग्ण असतात. इतकंच काय कॅशलेस मेडिक्लेमखाली रुग्ण दाखल केल्यानंतर; ‘रोजच्या वापराचे टूथब्रश, पेस्ट, केसांचे तेलही तुम्ही मेडिकल दुकानातून आणून द्या’, अशी मागणी करणारे महाभागही भेटतात. तेव्हा मेडिक्लेम हा फक्त वैद्यकीय उपचारांसाठी आहे याची त्यांना जाणीव द्यावी लागते. अशावेळी वाटतं, ‘ऊस गोड लागला म्हणून मुळापासून खायचा का?’
अजून एक पराकोटीची हक्क ओरबडणारी वृत्ती म्हणजे ‘रुग्णाचे बिल वाढवून मेडिक्लेम कंपनीला पाठवा ना डॉक्टर, मग कंपनीकडून तुम्हाला रक्कम आल्यावर प्रत्यक्ष बिलाच्या वर वाढविलेली रक्कम नंतर आम्हाला द्या किंवा आपण दोघे वाटून घेऊ.’ म्हणजे कुटुंबीयाच्या आजारातून आíथक नुकसान तर सोडाच, पण नफा मिळविणारी माणसं या जगात आहेत. आपण जर या गोष्टीला आक्षेप घेतला तर, ‘अमुक तमुक डॉक्टर करतात की, मग तुम्हाला काय हरकत आहे?’ असेही विचारतात. दुर्दैवाने ही गोष्ट आपले काही समव्यावसायिक करत असतील तर ही बाब अत्यंत लाजिरवाणी व खेदजनक असेल. अशा रुग्णांना आम्ही एक उत्तर देतो, ‘जर तू सांगितल्याप्रमाणे मी खोटं केलं, तर उद्या मी आवश्यक नसलेली शस्त्रक्रियाही खोटेपणाने तुझ्यावर करू शकतो, असं नाही का तुला वाटत? अशा डॉक्टरवर तू विश्वास ठेवशील का?’ मग उत्तर असतं, ‘नाही डॉक्टर, असं तुम्ही कसं कराल?’ मग आम्ही सांगतो, ‘मग जर माझ्यावर विश्वास ठेऊन आला असाल, तर अशी चुकीची गोष्टही इथे करायला सांगू नका. हे मला जमणार नाही!’ या उत्तरावर ते वरमतात. फुकट मिळणाऱ्या गोष्टीबद्दल माणूस किती अधाशी असू शकतो हे या घटनांतून दिसतं. एवढंच नव्हे, तर कॅशलेस मेडिक्लेमची सुविधा घेऊन उत्तमोत्तम स्पेशल रूम घेऊन सर्रासपणे खिडक्या उघडय़ा ठेवून वातानुकूलित मशीन लावणे, बाथरूमला जाऊन आल्यावरही तेथील दिवा चालू ठेवणे, टीव्हीवरील पेड चॅनल्स रुग्णालयाच्या खर्चाने बघणे वगरे दुष्प्रवृत्तींचे दर्शन अधूनमधून घडत असते. या लोकांना एकच प्रश्न विचारावासा वाटतो, ‘तुम्ही तुमच्या घरी असंच वागता का?’ पण असे थेट प्रश्न डॉक्टरने विचारणं रुग्णाला रुचत नाही.
नफ्यासाठी माणूस काय करू शकतो त्याचे एक उदाहरण- काही वर्षांपूर्वी एका नामांकित औषध कंपनीचा प्रतिनिधी मला विचारत होता; ‘काय हे डॉक्टर, मी एवढय़ा वेळेला तुमच्याकडे येतो, पण तुम्ही माझ्या कंपनीचं औषध फारसं लिहीत नाही. गावातला हाडवैद्य वैदूदेखील तुमच्या दसपटीने माझं औषध लोकांना लिहून देतो. खरं तर त्याला त्या औषधाचं स्पेिलग नीट येत नसल्याने मीच त्याला औषधाच्या नावाचा शिक्का बनवून दिला आहे’. ‘डॉक्टर नसलेल्या व्यक्तीकडे जाऊन तुम्ही तुमच्या औषधांचा प्रसार करणं अयोग्य नाही का?’ अशी मी विचारणा केल्यावर तो म्हणाला; ‘त्यात काय डॉक्टर, माझ्या कंपनीला त्याच्यामुळे केवढा धंदा मिळतो; मग मी त्याच्याकडे जाणारच!’ त्या औषधाविषयी काहीही ज्ञान नसलेल्या, डॉक्टर नसलेल्या व्यक्तीच्या हातात ते देताना त्याचे फायदे-तोटे, बरे-वाईट परिणाम, कोणत्या रुग्णाला ते द्यावे अथवा देऊ नये यासबंधी असलेल्या अज्ञानाचा समाजस्वास्थ्यावर काय परिणाम होईल याचा विचार न करता फक्त नफ्याचा विचार करणारी ही वृत्ती किती क्लेशकारक आहे!
 माणसाच्या विचित्र स्वभावाचा आणखी एक अनुभव खूपदा येतो. काही रुग्ण आजार वाढेपर्यंत घरगुती कारणमीमांसा व उपचार करत बसतात व डॉक्टरकडे गेल्यावर मात्र आजार जादूची कांडी फिरविल्याप्रमाणे ताबडतोब बरा होण्याची घाई करतात, डॉक्टरवर  दडपण आणतात. रिपोर्ट नॉर्मल आले; तर ‘हे काय डॉक्टर, उगाच आमचे पसे वाया घालवले, रिपोर्टमध्ये तर काहीच आलं नाही,’ असे म्हणतात (म्हणजे रिपोर्ट चांगले आल्याचं समाधान नाहीच) आणि तपासण्या लगेच सांगण्याची निकड कधी डॉक्टरांना वाटली नाही व काही दिवसांत एखाद्या आजाराचे निदान झाले तर डॉक्टरवर निष्काळजीपणाची केस करतात. एकीकडे डॉक्टरला आजार बरे होण्याची ‘गॅरेंटी’ मागतात व दुसरीकडे हेच लोक कावीळ गावठी पद्धतीने उतरविणाऱ्याकडे जाऊन तथाकथित उपायांनी कावीळ उतरविल्यावर साधी रक्ताची चाचणी करून शहानिशा करायलादेखील तयार नसतात- केवढा अंधविश्वास! किती हा विरोधाभास मनुष्य स्वभावाचा!
मनुष्यस्वभावाचे हे अनाकलनीय आविष्कार सर्व व्यवसायांत दिसून येत असणार. ‘डॉक्टरांचं जग’ तरी त्याला अपवाद कसं असणार!
vrdandawate@gmail.com