News Flash

कॉमन सेन्स

कॉमन सेन्स हा कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये उपयोगाचा असतो का? की तो फक्त पंचतंत्रातच शोभून दिसतो?

17-lp-prashantकॉमन सेन्स हा कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये उपयोगाचा असतो का? की तो फक्त पंचतंत्रातच शोभून दिसतो?

एकदा एका राजाच्या दरबारामध्ये एक सौदागर येतो. त्याच्याकडे दोन हिरे असतात. दोन्ही हिरे दिसायला एकदम हुबेहुब! सौदागर राजास म्हणतो, ‘‘महाराज आपण जर या दोघांमधील खरा हिरा ओळखलात तर मी तो तुम्हाला भेट म्हणून देईन, पण जर तुम्ही खरा हिरा ओळखलात नाही तर तुम्हाला मला हिऱ्याचे मूल्य तर द्यावेच लागेल, पण हिरा मात्र मिळणार नाही.’’ राजा या गोष्टीसाठी तयार होतो. पण खरा हिरा कोणता व खोटा कोणता त्याला काही ओळखता येत नाही. तो सौदागाराला हिऱ्याचे मूल्य अदा करणार इतक्यात राजाच्या दरबारातील एक अंध माणूस, राजाला त्याला खरा हिरा ओळखायची संधी द्यायला सांगतो. डोळस माणूस जर खरा हिरा ओळखू शकत नाही तर आंधळा कसा ओळखणार या विचाराने सौदागरदेखील तयार होतो.

अंध माणूस सौदागरास ते दोनही हिरे एक तास उन्हात ठेवण्यास सांगतो. तासाभरानंतर दोन्ही हिऱ्यांना हातात घेऊन आंधळा माणूस खरा हिरा कोणता ते सौदागरास ओळखून दाखवितो. सौदागर आश्चर्यचकित होतो. न राहवून तो अंध माणसास त्याने तो हिरा कसा ओळखला ते विचारतो. त्यावर तो अंध म्हणतो, ‘‘सोपे आहे, काच उन्हात जास्त गरम होते व हिरा तितका गरम होत नाही. त्यामुळे गरम लागला तो काचेचा तुकडा, थंड लागला तो खरा हिरा.’’

कॉर्पोरेट क्षेत्रामध्येपण असेच नसते का? विपरीत परिस्थितीमध्ये डोके शांत ठेवून काम करणारा खरा लीडर असतो, तर विपरीत परिस्थितीमध्ये स्वत:चे डोके गरम करून घेऊन, आक्रस्ताळेपणा करणारा माणूस परिस्थिती अजून बिघडवून टाकतो. तसेच हुशार लीडर केवळ कॉमन सेन्स वापरून हिऱ्याची (हुशार कर्मचाऱ्यांची) पारख करू शकतो.

एकदा मुंबईच्या बीकेसीमध्ये एका जर्मन कंपनीचे बांधकाम चालू होते. जमिनीखाली तीन मजले इतके खोदून झाले होते. या तळघरातील शेवटच्या बेसमेंटमध्येच जर्मनीमधून आणलेले एक ३० टन वजनाचे अद्ययावत मशीन ठेवायचे होते. पण हे मशीन खाली ढकलत असताना जरा जरी चूक झाली असती तर मोठे नुकसान होणार होते. म्हणूनच एक महाकाय क्रेन वापरायची होती, पण ती क्रेन जमशेदपूरवरून यायला १५ दिवस लागले असते. तोपर्यंत ज्या माथाडी लोकांनी बंदरावरून हे मशीन बीकेसीमध्ये आणले होते त्यांना नुसते बसवून पगार द्यावा लागणार होता. तसेच या क्रेनचे भाडे, वाहतूक खर्च हादेखील प्रचंड असाच होता.

सर्व अधिकारी वर्ग चिंतेमध्ये असतानाच माथाडी कामगारांचा मुकादम एक अभिनव कल्पना घेऊन आला. खोदलेल्या तीनही मजल्यांच्या जागेमध्ये त्याने बर्फाच्या लाद्या भरायला सांगितले. मग त्या लाद्यांवर ते मशीन ठेवण्यास सांगितले. जसजसा बर्फ वितळेल तसतसे ते मशीन खाली जाईल व पम्पच्या साह्यने वितळलेल्या बर्फाचे पाणी एका बाजूने बाहेर टाकता येईल अशी त्याची योजना होती. कॉमनसेन्सचे कॉर्पोरेट क्षेत्रातील अभिनव उदाहरण म्हणून त्याची ही योजना मग सर्वदूर मशहूर झाली.

असेच काहीसे भारतीय आर्मीने सियाचेनवर प्रथम पाऊल टाकताना केले. जेव्हा पाकिस्तानची वाईट नजर सियाचेनवर पडली तेव्हा भारतीय सैन्याने सियाचेनवर कायमस्वरूपी लष्करी तळ स्थापन करण्याचे ठरविले. पण तिथे बर्फ किती भुसभुशीत आहे किंवा किती घट्ट आहे याची पुसटशीदेखील कल्पना कोणाला नव्हती. अशा ठिकाणी हेलिकॉप्टर उतरवल्यास ते बर्फात रुतण्याची शक्यता होती किंवा सैनिक उतरले असते तर बर्फात गाडले जाण्याची शक्यता होती. कप्तान संजय कुलकर्णी यांना या आव्हानाची कल्पना असल्याने त्यांनी २५ किलोची गोणी हेलिकॉप्टरमध्ये आधीच ठेवली होती. कर्नल कुलकर्णी यांनी ही गोणी हेलिकॉप्टरमधून खाली टाकण्याचा आदेश दिला. ती गोणी बर्फात फारशी रुतली नाही हे पाहिल्यावरच भारतीय सैनिकांनी हेलिकॉप्टरमधून सियाचीनच्या ग्लेशियरवर उडय़ा मारल्या.

असेच काहीसे १९६५ च्या युद्धात पाकिस्तानच्या अजस्र पॅटन रणगाडय़ांना बेचिराख करताना भारतीय आर्मीने केले होते. अद्ययावत व प्रचंड संख्येने असलेल्या पाकिस्तानी रणगाडय़ांना, जुनाट व कमी संख्येने असणारे भारतीय रणगाडे समोरासमोर तोंड देऊ शकणार नाहीत हे ओळखून भारतीय सैन्य अधिकाऱ्यांनी माघार घेत, पॅटन रणगाडय़ांना भारतीय हद्दीत मोकळी वाट करून दिली. उसाच्या शेतांमध्ये पॅटन रणगाडे येतील अशी व्यूहरचना करण्यात आली. त्या आधी उसाच्या शेतांमध्ये कालव्याचे पाणी सोडण्यात आले होते. भुसभुशीत जमिनीमध्ये ते पाणी चांगलेच मुरले होते. जेव्हा ते अजस्र पॅटन रणगाडे शेतात आले तेव्हा त्यांच्या वजनामुळे ते आपोआपच भुसभुशीत मातीत रुतून बसले, तेव्हा लपलेल्या भारतीय रणगाडय़ांनी हल्ला केला व त्यांना निकामी करून टाकले.

एकदा एका धनाढय़ माणसाने आपल्या मर्जीनुसार एक रोल्स रॉईस बनवायला सांगितली. आपल्या मनासारखे बदल गाडीमध्ये करून घेताना जास्त हेड स्पेस मिळावी म्हणून त्याने गाडीची उंची काही सेंटिमीटर्सने वाढवून घेतली. पण इथेच घोळ झाला. ती उंच गाडी डीलरच्या गेटच्या कमानीतून जाऊ शकत नव्हती. गाडी बाहेर गेली असतीदेखील, पण तिचा टप कमानीला घासून गेला असता. डीलर शोरूममधील सर्व स्टाफ त्यामुळे चिंतित झाला. एकाने कमान तोडायचा पर्याय दिला तर दुसऱ्याने गाडी घासून बाहेर काढू व मग गाडीचे पेंटिंग वर्क परत एकदा करू असा पर्याय दिला. पण गाडीच्या मालकाला किंवा शोरूमच्या मालकाला हे पर्याय ठीक वाटले नाही. इतक्यात शोरूमचा रखवालदार या सर्वाच्या मदतीला धावून आला. त्याने गाडीच्या टायर्समधील हवा काढून टाकायला सांगितली व कारला टोइंग व्हॅनच्या मदतीने ओढून कमानीच्या खालून न्यायला सांगितली. टायरमधील हवा काढल्याने कारची उंची कमी झाली व ती कार कमानीमधून आपसूक सहीसलामत बाहेर आली.

आशा करतो की लेखाच्या सुरुवातीला विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर सुज्ञ वाचकांना मिळाले असेलच.
प्रशांत दांडेकर – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 11, 2016 1:41 pm

Web Title: common sense in corporate sector
Next Stories
1 निसर्गाच्या सान्निध्यात
2 लॅटरल थिंकिंग
3 कुरघोडी
Just Now!
X