महाराष्ट्र मंडळ बे एरिया गेल्या ३० वर्षांपासून गणेश उत्सव साजरा करत आहे. बे एरिया, सिलिकॉन व्हॅलीमधील मराठी लोकांना महाराष्ट्रासारखा गणेश उत्सवाचा अनुभव देणे व त्याच बरोबर अमेरिकेमधील नवीन पिढीस उत्सवाची ओळख करून देणे, हा त्यामागील उद्देश आहे.
मंडळाचा गणपती हा एक दिवसाचा असतो आणि गणेश चतुर्थीच्या जवळच्या रविवारी सनीवेल हिंदू मंदिरात साजरा केला जातो. उत्सवाची सुरुवात सकाळी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून होते. त्यानंतर अथर्वशीर्षांची एकवीस आवर्तने केली जातात. चित्रकला, मूर्ती घडविणे, विविध गुणदर्शन, तीन पायांची शर्यत या स्पर्धा लहान मुलांसाठी, तर रांगोळी, मोदक (पाककला), अंताक्षरी, चमचा लिंबू या स्पर्धा मोठय़ांसाठी दुपारी होतात. स्थानिक कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी मुक्त व्यासपीठ दोन तासांसाठी दिले जाते. संध्याकाळी बे एरियामधील नावाजलेले अथवा भारतीय कलाकार आपली सेवा गणपतीसमोर पेश करतात. गणपतीची आरती करून, छोटेखानी विसर्जन मिरवणूक मंदिर परिसरात काढली जाते. या मिरवणुकीचे आकर्षण हे मंडळाचे ‘स्पार्टन ढोल- ताशा- लेझीम पथक’ असते. हे पथक मंडळासाठी सॅन होजे विद्यापीठातील विद्यार्थी चालवतात. गणपती उत्सवातील सहभागी हजारभर लोकांची खानपान व्यवस्था मराठी खाद्यपदार्थाच्या विविध टपऱ्यांवर हौशी सदस्यांद्वारे केली जाते.
मंडळ गणपती उत्सावाखेरीज वर्षभर अनेक उपक्रम राबवत असते. त्यामध्ये प्रामुख्याने मराठी शाळा, चैत्रधून (गायन, वादन स्पर्धा ), शनिवार महाप्रसाद, स्वातंत्र्यदिन चित्ररथ, नाटक, नवीन चित्रपट आणि ढोल-लेझीम पथकाद्वारे मराठी संस्कृतीची ओळख यांचा समावेश होतो.
शार्दुल वेळापुरे