टू जी घोटाळ्यात सरकारी पक्षाच्या साक्षीदार म्हणून येत्या २३ ऑगस्टला दिल्लीतील न्यायालयात हजर होण्यापासून सूट मिळावी, यासाठी टिना अंबानी यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. पूर्वनियोजित काम असल्यामुळे २३ ऑगस्टला न्यायालयात हजर होण्यापासून सूट देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी न्यायालयाकडे केली आहे.
येत्या २३ ऑगस्टला टिना अंबानी न्यायालयात येऊन साक्ष नोंदविणार होत्या. टू जी घोटाळ्यात सरकारी पक्षाचे साक्षीदार म्हणून साक्ष नोंदविण्यास अनिल अंबानी, टिना अंबानी यांना बोलावण्यात यावे, अशी मागणी सीबीआयने न्यायालयात केली होती. सीबीआयचे विशेष न्यायाधीश ओ. पी. सैनी यांनी त्यांची मागणी मान्य करून अंबानी दाम्पत्यांसह इतरांना साक्ष देण्यासाठी समन्स बजावले होते.
२३ ऑगस्ट रोजी साक्ष देण्यासाठी दिल्लीला येणे पूर्वनियोजित कामामुळे शक्य होणार नाही, असे टिना अंबानींनी आपल्या याचिकेमध्ये म्हटले आहे. सीबीआयचे वकील के. के. गोयल यांनी टिना अंबानी यांच्या याचिकेला विरोध केला. अनिल अंबानी यांनीसुद्धा अशाच पद्धतीने न्यायालयापुढे साक्ष देण्यासाठी येण्यास टाळाटाळ केली होती, असा युक्तिवाद त्यांनी न्यायालयापुढे केला.