सध्या इस्त्रायल आणि पॅलेस्टाइनमध्ये मोठ्या प्रमाणात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. इस्लामी गट आणि इतर पॅलेस्टाईनमधील अतिरेक्यांनी तेल अवीव आणि बिर्शेबा येथे रॉकेट हल्ले केल्यामुळे इस्रायलने बुधवारी सकाळी गाझावर शेकडो हवाई हल्ले केले आहेत. यामध्ये ३५ पॅलेस्टाइनमधील नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर इस्त्रायलमधील पाच नागरिकांचा मृत्यू झाला आहे. याआधी गाझा पट्टीवरील हमास या संघटनेने तेल अविव येथे १३० रॉकेट सोडले होते. प्रतिउत्तरादाखल इस्त्रायलने एयरस्ट्राईक केला आहे. ज्यामध्ये गाझा येथील एक निवासी इमारत उद्धवस्त करण्यात आली आहे. रॉयटर्सने यांसंदर्भात वृत्त दिले आहे.

बुधवारी पहाटे इस्त्रायलच्या विमानांनी हमासच्या अनेक नेत्यांना लक्ष्य केले आणि ठार केले, असे इस्रायलने म्हटले आहे. रॉकेट हल्ल्यामध्ये हमासची कार्यालये आणि हमास नेत्यांच्या घरांनाही लक्ष करण्यात आले आहे. याआधी कट्टरतावाद्यांनी इस्राईलच्या जेरुसलेम आणि इतर भागात शेकडो रॉकेट्स डागली होती.

२०१४ मध्ये गाझामध्ये झालेल्या युद्धानंतर इस्राईल आणि हमास यांच्यातील हा सर्वात मोठा संघर्ष असल्याचे दिसत आहे. यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची चिंता आंतरराष्ट्रीय स्तरावर केली जात आहे.

काय आहे नेमका हा वाद

जेरुसलेममध्ये इस्त्रायली पोलीस आणि पॅलेस्टाईनच्या नागरिकांमध्ये वाद झाल्यानंतर हमास आणि इस्त्रायलमध्ये हे युद्ध पेटले आहे. ही जागा मुस्लिम आणि ज्यू दोघांसाठीही पवित्र आहेत. मुस्लिम याला हराम अल् – शरीफ ( पवित्र ठिकाण) म्हणतात तर ज्यू याला टेंपल माऊंट म्हणून ओळखतात.

इस्रायलने जेरुसलेमचा पूर्व भाग १९६७ साली आपल्या ताब्यात घेतला होता पण बहुतांश देशांनां हे अमान्य होतं. पॅलेस्टिनी लोकांनी जेरुसलेमवर हक्क सांगितल्याने हा वाद चिघळला आहे. गेल्या काही दिवसांपासून जेरुसलेममधला तणाव वाढला आहे. ईस्ट जेरुसलेमवर हक्क सांगणाऱ्या ज्यू लोक येथून पॅलेस्टिनी लोकांना हिसकावून लावत असल्याचा आरोप केला जात आहे. इस्रायलच्या सुप्रीम कोर्टात या प्रकरणावर सुनावणी होणार होती, पण हिंसाचाच्या घटनांमुळे ती पुढे ढकलण्यात आली आहे.

पॅलेस्टाईनमधील लोकांचा असा विश्वास आहे की एकदा त्यांचा देश स्वतंत्र झाला की पूर्व जेरूसलेम त्यांच्या देशाची राजधानी होईल. पूर्व जेरूसलेममधील शेख जर्रा येथून पॅलेस्टाईन कुटुंबीयांना बाहेर काढण्यात येत असल्याचे पॅलेस्टाईनचे म्हणणे आहे. त्यावरून हा वाद सुरू आहे.