गृहराज्य मंत्री आर.पी.एन. सिंग यांनी सांगितले की, २०१० ते २०१२ या काळात पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधून १००० दहशतवाद्यांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. घुसखोरीच्या प्रयत्नात १६० दहशतवादी मारले गेले व इतर ५७० सुरक्षा दलांच्या कडक गस्तीमुळे परत माघारी गेले. २०१० मध्ये ९५, २०११ मध्ये ५२, तर २०१२ मध्ये १२१ दहशतवादी घुसखोरी करण्यात यशस्वी झाले, अशी माहितीही त्यांनी दिली. जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा मोठा धोका आहे. पाकिस्तानची आयएसआय ही गुप्तचर संस्था गेली वीस वर्षे या कारवायांचे नेतृत्व करीत आहे. दहशतवाद्यांना पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील छावण्यांत शस्त्रे चालवण्याचे व मूलतत्त्ववादी विचारसरणीचे प्रशिक्षण दिले जाते व नंतर त्यांना घुसखोरी करण्यास सांगितले जाते. सध्या पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमध्ये ४२ प्रशिक्षण छावण्या असल्याचे त्यांनी अखेरीस सांगितले.

पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणाऱ्या ४२ छावण्या असून गेल्या तीन वर्षांत २७० अतिरेक्यांनी प्रत्यक्ष ताबा रेषा ओलांडून घुसखोरी केली, असे सरकारने मंगळवारी लोकसभेत सांगितले.