मुंबई: नवी मुंबई येथून मुलुंडला जाणाऱ्या एका बेस्ट बसमध्ये बॉम्ब असल्याचा ई-मेल शनिवारी दुपारी बेस्ट उपक्रमाच्या एका मेलवर आला. या ई-मेलमुळे बेस्ट उपक्रमात गोंधळ उडाला. पोलिसांनी तत्काळ नवी मुंबई येथून येणाऱ्या सहा बसगाड्यांची आणि मुलुंड बेस्ट डेपोची तपासणी केली. मात्र तेथे कुठल्याही प्रकारची संशयास्पद वस्तू आढळली नाही. दरम्यान, नवी मुंबई परिसरातून हा ई-मेल पाठवणाऱ्या आरोपीला एटीएसने अटक केली आहे.

चार दिवसांपूर्वी दिल्लीतील काही शाळांमध्ये बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल पाठविण्यात आला होता. त्यानंतर संपूर्ण दिल्लीत एकच गोंधळ उडाला होता. अशाच प्रकारचा एक ई-मेल शनिवारी सकाळी बेस्ट उपक्रमाच्या वडाळा येथील नियंत्रण कक्षाच्या मेलवर आला होता. बेस्टच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ ही माहिती मुंबई पोलिसांना दिली. त्यानुसार मुलुंड पोलिसांसह श्वान पथक आणि बॉम्ब शोधक पथक घटनास्थळी दाखल झाले.

हेही वाचा – दीड वर्षात निवासी डॉक्टरांवर नऊ वेळा हल्ले, सुरक्षा व्यवस्था भक्कम करण्यासाठी ‘मार्ड’चे राज्य सरकारला पत्र

हेही वाचा – वाहतुकीचे नियम मोडल्याप्रकरणी दोन हजार वाहनचालकांवर कारवाई, मुंबई पोलिसांच्या ‘ऑल आऊट’ मोहिमेतून कारवाईचा बडगा

पोलिसांनी नवी मुंबई येथून येणाऱ्या ५१२ मार्ग क्रमांकाच्या ६ बसची तपासणी केली. मात्र या बसमध्ये कुठल्याही प्रकारची संशयास्पद वस्तू आढळली नाही. खबरदारीची उपाययोजना म्हणून पोलिसांनी संपूर्ण मुलुंड बस आगार रिकामे करून तपासणी केली. मात्र तेथेही कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. याबाबत राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) हा ई-मेल पाठवणाऱ्या इसमाचा शोध सुरू केला. हा ई-मेल नवी मुंबईतून पाठवल्याचे उघडकीस आले. त्यानुसार एटीएसच्या अधिकाऱ्यांनी नवी मुंबई परिसरातून हर्षिल पानवाला (२१) या तरुणाला ताब्यात घेतले. त्याला पुढील तपासासाठी रफी अहमद किडवाई मार्ग पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.