दिल्लीच्या विशेष कोर्टाने माजी अर्थमंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांना अटक करुन चौकशी करण्याची मंगळवारी ईडीला परवानगी दिली. कोर्टाच्या या आदेशामुळे चिदंबरम यांच्यासाठी हा मोठा झटका मानला जात आहे. त्यामुळे आता ईडी उद्या (बुधवारी) तिहार जेलमध्ये जाऊन चिदंबरम यांची चौकशी करणार आहे.

दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टाने आयएनएक्स मीडिया आर्थिक घोटाळाप्रकरणी पी. चिदंबरम यांना अटक करुन केवळ ३० मिनिटांसाठी चौकशी करण्याची परवानगी दिली. कोर्टातच चिदंबरम यांना अटक आणि चौकशी करण्याच्या मागणीवर कोर्टाने ईडीला म्हटले की, जर तुम्ही चिदंबरम यांना सार्वजनिकरित्या अटक करुन चौकशी करणार असाल तर ती बाब योग्य होणार नाही. दरम्यान, कोर्टाने ईडीच्या अर्जावर प्रॉडक्शन वॉरंट जारी करुन चिदंबरम यांना कोर्टात हजर करण्याचे आदेश दिले होते. विशेष सीबीआय कोर्टाचे न्या. अजकुमार कुहार यांनी सोमवारी ईडी आणि बचाव पक्षाचा युक्तीवाद ऐकल्यानंतर निर्णय मंगळवारी चार वाजेपर्यंत राखून ठेवला होता.

सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी कोर्टासमोर चिदंबरम यांच्या अटकेची मागणी करीत म्हटले होते की, आयएनएक्स मीडिया प्रकरणी आर्थिक घोटाळा सीबीआयच्या खटल्यापेक्षा वेगळा आहे. त्यामुळे त्यांना अटक करुन चौकशी करणे गरजेचे आहे. सुप्रीम कोर्टाने देखील यावर आपली सहमती दिली आहे. मात्र, दुसरीकडे ईडीच्या अर्जाला विरोध करताना वरिष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल यांनी म्हटले की, हा संपूर्ण खटला एकच असून ईडीचा संपूर्ण खटला हा सीबीआयच्या एफआयआरवर आधारित आहे.

सिब्बल म्हणाले, सीबीआयने या प्रकरणात त्यांच्या आशिलांची चौकशी केली आहे. सीबीआयच्या चौकशीनंतरच त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले होते. त्यामुळे ईडीला रिमांड देण्यात येऊ नये.