दलित विद्यार्थ्यांच्या आत्महत्येने पंतप्रधान व्यथित
हैदराबाद विद्यापीठातील दलित संशोधक विद्यार्थी रोहित वेमुला याच्या आत्महत्येप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन सोडले आहे. एका मातेने आपला पुत्र गमावला आहे. त्याची मला वेदना आहे अशा शब्दात पंतप्रधानांनी दु: ख व्यक्त केले. डॉ. आंबेडकर विद्यापीठात पदवीप्रदान समारंभात मोदी प्रमुख पाहुणे होते. त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान, रोहित वेमुला याच्या आत्महत्या केल्याप्रकरणी चौकशीसाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयाने न्यायिक आयोग स्थापन करण्याचे जाहीर केले आहे.
पंतप्रधानांनी आपल्या भाषणात रोहितच्या हत्येमागील राजकारणाचा काही संदर्भ दिला नाही. २१ वे शतकात भारत हा युवकांचा देश अशी जगात प्रतिमा असताना, एका युवकाला आत्महत्या करावी लागणे वेदनादायी असल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत निर्माण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत, असे मोदींनी स्पष्ट केले. आपल्या ३५ मिनिटांच्या भाषणात मोदींनी वारंवार आंबेडकर यांच्या कार्याचा उल्लेख केला. विद्यार्थ्यांनी कठीण परिस्थितीला तोंड देण्याचे धैर्य दाखवावे, असे आवाहन पंतप्रधानांनी केले.
आंबेडकरांना अनेक यातना सहन कराव्या लागल्या, कठीण परिस्थितीला तोंड द्यावे लागले. मात्र त्यांनी तक्रार न करता परिस्थितीवर मात केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. इतर देशांतून आमंत्रण असताना आंबेडकरांनी देशवासीयांची सेवा केली. ‘रोजगार मागणारे होण्यापेक्षा रोजगार निर्माण करणारे व्हा’ हे बाबासाहेबांचे स्वप्न होते. त्याचा उल्लेख करीत नुकत्याच दिल्लीत झालेल्या दलित उद्योजकांच्या बैठकीचाही संदर्भ दिला. मोदींनी सरकारने स्वयंरोजगारासाठी राबवलेल्या विविध योजनांचा उल्लेख भाषणात केला. मोदींच्या विरोधात घोषणाबाजी केल्याने दोन युवकांना ताब्यात घेण्यात आले. आम्ही सर्व काळजी घेतली होती तरीही या युवकांनी घोषणाबाजी केली. त्यांच्यावर नियमानुसार कारवाई केली जाईल, असे विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

चौकशीसाठी आयोग
रोहित वेमुला याच्या आत्महत्या केल्याप्रकरणी चौकशीसाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयाने न्यायिक आयोग स्थापन करण्याचे जाहीर केले आहे. एकसदस्यीय सत्यशोधन समितीचा अहवाल आल्यानंतर त्याआधारे हा निर्णय घेण्यात आला. वेमुला याच्या आत्महत्येस कोणत्या गोष्टी कारण ठरल्या, याचा शोध आयोग घेणार आहे. न्यायिक आयोग तीन महिन्यांत या प्रकरणी अहवाल सादर करील, असे मनुष्यबळ विकास मंत्रालयाने म्हटले आहे. सत्यशोधन समितीने २२ जानेवारीला अहवाल सादर केला आहे व त्याच्या आधारे न्यायिक चौकशी आयोग स्थापन केला जाईल, असे सांगण्यात आले. रोहितचा मृतदेह रविवारी विद्यापीठाच्या वसतिगृहात सापडला होता. रोहित याने त्याच्या पत्रात आपण जीवनास कंटाळलो होतो, असे म्हटल्याचा दावा करण्यात आला आहे पण या आत्महत्येमुळे केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रेय व मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी अडचणीत आले आहेत. केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी वेमुलाच्या आईशी संवाद साधला व त्यांनी त्यांचे सांत्वन केले.

निलंबन बिनशर्त मागे घेण्याची मागणी
ल्लसंशोधक विद्यार्थी रोहित वेमुला याच्या आत्महत्येप्रकरणी चार दलित विद्यार्थ्यांचे निलंबन बिनशर्त मागे घ्यावे व संबंधितांवर तातडीने कारवाई करावी, या मागणीसाठी हैदराबाद केंद्रीय विद्यापीठात संघर्ष तीव्र करण्यात आला आहे.
ल्लवर्गात परतण्याचे कुलगुरूंचे आवाहन विद्यार्थ्यांनी धुडकावून लावले आहे, ते ऐकण्याच्या मन:स्थितीत नाहीत. चार दलित विद्यार्थ्यांचे निलंबन मागे घेतले असले तरी ते बिनशर्त नाही, असे विद्यापीठाच्या परिपत्रकातून दिसत आहे. त्यामुळे यातील सर्व अटी मागे घ्याव्यात, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
ल्लनिलंबन मागे घेताना लादलेल्या अटी आम्ही फेटाळत आहोत, असे विद्यार्थी नेता झुहैल याने सांगितले. दरम्यान, कुलगुरू प्रा. अप्पाराव यांनी विद्यार्थी व शिक्षकांशी संवाद सुरू करावा, असे आवाहन शिक्षकांनी केले आहे.