डासू कंपनीच्या सीईओंना काँग्रेसने प्रत्युत्तर दिले असून आरोपी स्वत:च्या खटल्यातील न्यायाधीश होऊ शकत नाही, असे ट्विट काँग्रेस नेते रणदीपसिंह सुरजेवाला यांनी केले आहे. सारे काही ठरवून घेतलेली मुलाखत आणि खोटे दावे यामुळे राफेल घोटाळा दाबता येणार नाही, अशा आशयाचे ट्विट सुरजेवाला यांनी केले आहे.

राफेल करारावरुन काँग्रेस आक्रमक झाली असून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या आरोपांवर ‘डासू’ या कंपनीचे सीईओ एरिक त्रपिएर यांनी मंगळवारी उत्तर दिले. आम्ही कोणत्याही पक्षासोबत काम करत नाही. आम्ही भारतासाठी काम केले. आमचा संबंध हा कोणत्याही पक्षाशी नाही, असे त्यांनी म्हटले होते. त्यांच्या या मुलाखतीनंतर काँग्रेस नेते रणदीपसिंह सुरजेवाला यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ठरवून घेतलेल्या मुलाखती, खोटे दावे करुन राफेल घोटाळा दाबता येणार नाही. लाभार्थी आणि सह आरोपींच्या विधानांना अर्थ नसतो हा कायद्याचा पहिला नियम आहे. लाभार्थी आणि आरोपी हे स्वत:च्याच खटल्यातील न्यायाधीश होऊ शकत नाही, हा कायद्यातील दुसरा नियम असतो. शेवटी सत्य बाहेर येत राहणार, अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे.

दरम्यान, एरिक त्रपिएर यांनी मुलाखतीमध्ये राफेल करारात घोटाळा नसल्याचा दावा केला आहे. रिलायन्स कंपनीची निवड आम्हीच केल्याचा दावाही त्यांनी केला. आम्ही काँग्रेसचे सरकार असतानाही काम केले असून १९५३ मध्ये जवाहरलाल नेहरु पंतप्रधान असताना आमच्या कंपनीने भारताशी पहिल्यांदा करार केला होता, अशी आठवणही त्यांनी राहुल गांधी यांना करून दिली.