जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) वसतिगृह फी वाढीसहित इतर अनेक मुद्द्यांवर सुमारे पंधरा दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर निषेध आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर अखेर विद्यापीठ प्रशासन झुकले आहे. विद्यार्थ्यांच्या वाढत्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी झालेल्या प्रशासनाच्या बैठकीत फीवाढ मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

यापूर्वी जेएनयूच्या विद्यार्थी संघटनेने विद्यार्थी बैठक कक्षाच्या बाहेर एकत्र येत दिवसभर आंदोलन केले होते. दोन दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या बाहेर मोठा निषेध मोर्चाही काढला होता. तसेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनेही युजीसीच्या कार्यालयाबाहेर फी वाढीविरोधात आंदोलन केले होते.

विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या जोरदार विरोध आंदोलनानंतर विद्यापीठाचे मुख्यद्वार कुलूप लावून बंद करण्यात आले होते. दरम्यान, मंगळवारी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत कडक व्यवहार करणाऱ्या पोलिसांविरोधात बुधवारी इथल्या शिक्षक संघटनेने कुलगुरुंच्या राजीनाम्याची मागणी केली. शिक्षक संघटनेचे म्हणणे आहे की, शांततेत आंदोलन करणाऱ्या विद्यर्थ्यांसोबत पोलिसांनी बळाचा वापर केला. यामध्ये अनेक विद्यार्थी गंभीररित्या जखमी झाले.

हे सर्व कुलगुरुंच्या सांगण्यानुसारच झाले आहे. त्यामुळे त्यांनी त्वरीत आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. पोलिसांच्या या कारवाईमुळे हे स्पष्ट होते की विद्यार्थ्यांसोबत चर्चा टाळण्यासाठी कुलगुरु वारंवार पोलिसांचा आसरा घेत आहेत, असा आरोप शिक्षक संघटनेने केला आहे. त्याचबरोबर शिक्षक संघटनेने वसतिगृह आणि मेसच्या फीमध्ये झालेल्या वाढीवरुन विद्यापीठ प्रशासनाचा विरोध करीत विद्यार्थी संघटनांच्या मागण्यांना पाठींबा दर्शवला आहे.

शिक्षकांचे म्हणणे आहे की, विद्यापीठाचे हे कर्तव्यच आहे की विद्यार्थ्यांना किफायतशीर दरात राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था उपलब्ध करुन देणे. वसतिगृह स्वखर्चाच्या आधारावर चालवण्याचा नवा नियमही शिक्षक संघटनेला स्विकारार्ह नाही.