करोनाचा चीननंतर युरोपलाही मोठा फटका बसला असून जवळपास सगळा युरोप बंद असून सर्व देशांनी त्यांच्या सीमा बंद केल्या आहेत.

सोमवारी जी ७ देशांनी विषाणूमुळे होत असलेली आर्थिक पडझड रोखण्याचा निर्धार केला असून फ्रान्सचे अध्यक्ष एमॅन्युअल मॅक्रॉन यांनी फ्रान्समधील लोकांना पंधरा दिवस घरीच राहण्यास सांगितले आहे. त्यांची ही स्व विलगीकरणाची प्रक्रिया मंगळवारपासून सुरू झाली आहे. अनावश्यक सामाजिक संपर्क टाळून कुणीही घराबाहेर पडू नये अन्यथा शिक्षा केली जाईल असे आदेश जारी करण्यात आले आहेत. करोना हे मोठे युद्धच असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

युरोपीय समुदायाच्या सीमा मंगळवारपासून तीस दिवस बंद करण्यात आल्या असून जगात ७००७ बळी गेले आहेत. १४५ देशांत १७५५३० जणांना संसर्ग झाला आहे.विषाणूचा प्रसार आता युरोपमध्ये वेगात झाला असून फ्रान्स, इटली, स्पेन यांना मोठा फटका बसला आहे त्यांनी अनेक निर्बंध लागू करून सीमा बंद केल्या आहेत. देशात सार्वजनिक कार्यक्रम  बंद करण्यात आले असून संचारबंदी लागू केली आहे. स्पेन व रशिया यांनी सोमवारीच त्यांच्या सीमा बंद केल्या असून जर्मनीने कठोर निर्बंध लादले आहेत. ट्रम्प यांनी सांगितले की, अमेरिकेत १० पेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमू नये, असे आदेश देण्यात आले असून वॉशिंग्टन व न्यूयॉर्कमध्ये सगळीकडे शुकशुकाट आहे. विषाणूमुळे आता बहुतांश देशात मंदी येण्याची चिन्हे आहेत. जगातील नेत्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली. त्यात ब्रिटन, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान व अमेरिका यांचा समावेश होता.

दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख घेब्रेसस यांनी सांगितले की, आंधळेपणाने करोनाचा सामना करून चालणार नाही, संशयित व्यक्तींच्याही पटापट चाचण्या करणे गरजेचे आहे. इटलीमध्ये २००० हून अधिक बळी गेले असून ब्रिटनमध्ये अनावश्यक संपर्क टाळण्याचे आदेश दिले आहेत. स्वित्र्झलडमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. जर्मनीत चर्च, मशिदी, अग्यारी बंद होते. इराणमध्ये अनेक बळी गेले आहेत. कॅनडाने सर्व सीमा परदेशी नागरिकांना बंद केल्या आहेत. करोनातून सावरण्यासाठी बँक ऑफ जपानने आर्थिक योजना जाहीर केली आहे.

वॉल स्ट्रीटवर शेअरचे भाव १० टक्के कोसळले असून  युरोपातील फियाट ख्रिसलर, प्युगोट या कंपन्यांनी मोटार प्रकल्प बंद केले आहेत. अनेक विमान कंपन्यांनी त्यांची उड्डाणे रद्द केली आहेत.

जगभरात ७००७ बळी

पॅरिस : जगात करोना विषाणूने घेतलेल्या बळींची संख्या आता ७००७ झाली असून एकूण १७५५३६ जणांना संसर्ग झाला आहे. चीनमध्ये ३२१३ बळी गेले असून त्याखालोखाल इटलीत २१५८ जण मरण पावले. तेथे २८ हजार लोकांना संसर्ग झाला आहे. युरोपमध्ये कठोर उपाययोजना करण्याची गरज जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली आहे.