सोशल मिडियावर अनेकदा वेगवेगळ्या गोष्टी ट्रेण्ड होत असतात. अनेकदा येथे दोन दिग्गज व्यक्ती एकमेकांविरोधातील वक्तव्य करतानाही दिसतात. तसंच काहीसं चित्र सध्या दिसून येत आहे. काँग्रेस नेता आणि खासदार शशी थरूर आणि ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांच्यात ट्विटरवर सध्या चांगलीच शाब्दिक बाचाबाची सुरु आहे. हे दोघेही सध्या सोशल नेटवर्किंगवर देशभक्तीची व्याख्या काय यावरुन वाद घालताना दिसत आहेत.

झालं असं की थरुर यांनी अनुपम खेर यांचं एक जुनं ट्विट शेअर करत मी तुमच्या मताशी सहमत आहे. २०१२ सालातील खेर यांनी एडवर्ड अॅबे यांचं एक वाक्य ट्विट केलं होतं. “देशभक्ताने कायम त्यांच्या सरकारपासून देशाला वाचवण्यासाठी तयार राहिलं पाहिजे,” असं एडवर्ड यांचं हे वाक्य होतं. याच ट्विटचा स्क्रीनशॉर्ट शेअर करत थरुर यांनी “अनुपम खेर यांच्या मताशी मी सहमत आहे. देशभक्ती म्हणजे तुमच्या कायमच तुमच्या देशाचे समर्थन करणे आणि गरज पडेल तेव्हा तुमच्या सरकारचेही समर्थन करणे” असं मार्क ट्विन या लेखकाचं वाक्य ट्विट केलं.

थरुर यांच्या या ट्विटचा स्क्रीनशॉर्ट शेअर करत आपली प्रतिक्रिया नोंदवली. “तुम्ही माझं २०१२ चं ट्विट शोधून काढलं आणि त्यावर आज प्रतिक्रिया दिली. हे केवळ बेरोजगारी आणि वैचारिक दारिद्रय दाखवतं. तुसेच तुम्ही माणूस म्हणून किती खालच्या दर्जाचा विचार करता हे ही यामधून दिसून येतं. माझं हे ट्विट ज्या लोकांसाठी होतं ते आज भ्रष्टाचारी म्हणून ओळखले जातात,” असा टोला खेर यांनी लगावला आहे.

खेर यांच्या या ट्विटवर थरुर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “प्रिय अनुपम खेर, तुमचं २०१२ चं ट्विट शोधून काढणं म्हणजे दर्जा खालावणं असेल तर तुम्ही केवळ १९६२, १९७५ आणि १९८४ बद्दल बोलणाऱ्या सरकारबद्दल काय म्हणाल? हे सुद्धा बेरोजगारी आणि वैचारिक दारिद्रयाचे प्रमाण आहे का? ज्यांना फक्त भारताचं अपयशच दिसतं त्यांच्यासाठी हे ट्विट मी केलं आहे,” असा टोला थरुर यांनी खेर यांच्या ट्विटला उत्तर देताना लगावला आहे.

भारत चीन सीमेवरील संबंध तणावपूर्ण झाले असून यावरुन आता काँग्रेस आणि भाजपामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरु आहेत. भाजपाच्या अनेक नेत्यांनी मागील काही दिवसांमध्ये चीन प्रश्नाचा संदर्भ देत १९६२ चा आणि भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचा उल्लेख केला आहे. यावरुनच आता या दोन दिग्गजांमध्ये ट्विटरवॉर सुरु झाली आहे.