दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची तुलना चक्क भगवान कृष्णा-अर्जुनाशी केली आहे. एका कार्यक्रमात ते बोलत होते. जम्मू-काश्मीरला स्वायत्त राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्यामुळे रजनीकांत यांनी मोदी आणि अमित शाह यांची स्तुती केली आहे. उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या पुस्तक प्रकशन कार्यक्रमात रजनीकांत बोलत होते. यावेळी गृहमंत्री अमित शाह यांचीही उपस्थिती होती.

मिशन काश्मीरसाठी अमित शाह यांना रजनिकांत यांनी शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शाह भगवान ‘कृष्ण’ आणि ‘अर्जुन’ सारखे आहेत. आपल्याला माहित आहे कृष्ण कोण आणि अर्जुन कोण आहेत.’ २०२१ मध्ये तामिळनाडूत होणारी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचेही रजनीकांत यांनी यावेळी बोलताना सांगितले.

संविधानातील ३७० कलम खूप आधीच हटवणे गरजेचे होते, याचा काश्मीरला कोणताही फायदा झालेला नाही. मात्र, आता ते हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमधून दहशतवाद संपेल आणि राज्य विकासाच्या दिशेने मार्गक्रमण करेल, असा विश्वास यावेळी शाह यांनी व्यक्त केला. लोकसभेत आधी विधेयक मांडले असते तर राज्यसभेत त्यावर मोठा गोंधळ होण्याची भीती होती त्यामुळे ते आधी राज्यसभेतच मांडण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.