अॅमेझॉनचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझॉस यांनी २५ वर्षांच्या संसारानंतर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. पत्नी मॅकेन्झीपासून ते विभक्त होणार आहेत. अमेरिकन वर्तमानपत्र नॅशनल इनक्वायररनुसार हा जगातला सर्वात महागडा घटस्फोट ठरु शकतो तसेच या घटस्फोटाची प्रकिया झाल्यानंतर बिल गेट्स पुन्हा एकदा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरु शकतात.

५४ वर्षीय जेस बेझॉस लॉरेन सांचेझच्या (४९) प्रेमात पडले आहेत. लॉरेन माजी न्यूज अँकर आणि हेलिकॉप्टर वैमानिक म्हणून ओळख आहे. सांचेझही तिच्या नवऱ्यापासून विभक्त झाली आहे. हॉलिवडू चित्रपटसृष्टीशी संबंधित असलेल्या पॅट्रीक व्हाईटसेलबरोबर तिचे लग्न झाले होते. इनक्वायररनुसार पॅट्रीक आणि बेझॉस दोघे मित्र आहेत. बेझॉस यांनी लॉरेन सांचेझला पाठवलेला प्रेमाचा एक संदेशही आपल्याकडे असल्याचा दावा नॅशनल इनक्वायररने केला आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

ब्लूबर्गच्या माहितीनुसार जेफ बेझॉस यांच्याकडे एकूण 137 बिलियन डॉलर इतकी संपत्ती आहे. त्यात ८० मिलियन शेअर्सचा वाटा आहे. वॉशिंग्टन पोस्ट या वर्तमानपत्राची मालकी सुद्धा बेझॉस यांच्याकडे आहे. टीएमझेड या संकेतस्थळानुसार घटस्फोटानंतर बेझॉस आणि त्यांची पत्नी मॅकेन्झी यांच्यामध्ये संपत्ती वाटपाची प्रक्रिया खूप कठीण ठरु शकते.

या जोडप्याकडे ४ लाख एकर जमीन आहे. बेझॉस यांना चार मुले आहेत. घटस्फोटामुळे त्यांच्या एकूण संपत्तीमध्ये मोठा फरक पडू शकतो. श्रीमंतांच्या जागतिक क्रमवारीमधील त्यांचे स्थान बदलू शकते. बेझॉस आणि मॅकेन्झी यांच्यामध्ये संपत्तीचे समान वाटप झाले तर मॅकेन्झी यांना ६९ बिलियनची संपत्ती मिळू शकते. ज्यामुळे त्या जगातील सर्वात श्रीमंत महिला ठरु शकतात. घटस्फोटानंतर संपत्तीची विभागणी झाली तर मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स पुन्हा एकदा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरु शकतात. त्यांच्याकडे सध्या ९२.५ बिलियन डॉलरची संपत्ती आहे.