अमृतसरच्या राजासांसी परिसरातील अादिवाल गावात निरंकारी भवन येथे ग्रेनेड हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी असल्याची माहिती आहे. येथील निरंकारी भवनामध्ये सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी दुचाकीवरुन आलेल्या दोन अज्ञात तरुणांनी मंचाच्या दिशेने ग्रेनड फेकला. त्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला. हे दोघेही चेहरा झाकून आले होते. स्फोटानंतर या परिसरात एकच धावपळ उडाली. या हल्ल्यानंतर अमृतसरसह संपूर्ण राज्यात नाकाबंदी करण्यात आली असून नोएडा, दिल्ली, गुरुदासपूर, पठाणकोटसहीत इतर शहरांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे.

दुपारी 12 च्या सुमारास हा ग्रेनेड हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनास्थळी अमृतसर पोलीस दाखल झाले असून हा दहशतवादी हल्ला होता का याबाबत कसून तपास सुरू आहे. दोन दिवसांपूर्वीच अमृतसर पोलिसांनी हाय अलर्ट जारी केला होता, तसंच ज्या गावात ही घटना घडली ते गाव भारत-पाकिस्तान सीमेवर असल्यामुळे हा दहशतवादी हल्ला होता का याबाबत पोलीस तपास करत आहेत. याशिवाय काश्मीरमधील दहशतवादी झाकीर मुसा त्याच्या साथीदारांसह पंजाबमार्गे भारतात येणार असल्याची माहिती गुप्तचर विभागाने यापूर्वीच दिल्ली पोलिसांना दिली होती. तसेच जैश-ए-मोहम्मदचे 6-7 अतिरेकी फिरोजपूरला आले असून ते हल्ल्याचं षडयंत्र रचत असल्याचा इशाराही देण्यात आला होता.

या स्फोटात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर काही जण जखमी झाले. जखमींपैकी काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.