मुस्लीम कब्रस्तानाच्या जागी राम मंदिर बांधणं उचित आहे का? असा प्रश्न आता नऊ मुस्लीम नागरिकांनी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला विचारला आहे. या नागरिकांनी एक पत्र पाठवून हा प्रश्न उपस्थित केला आहे. बाबरी मशिदीच्या जवळच्या परिसरात अनेक ठिकाणी दफनभूमी आहेत. मशिदीजवळच्या ४ एकर जागेचा उपयोग मुस्लिमांकडून दफनभूमी म्हणून करण्यात आला आहे. त्या जागी आता राम मंदिर उभारलं जाणार का ? असाही प्रश्न या पत्रात विचारण्यात आला आहे.

या नागरिकांनी ट्रस्टींना उद्देशून हे पत्र लिहिलं आहे. १८५५ च्या दंगलीत मारल्या गेलेल्या ७५ मुस्लिमांना या ठिकाणी दफन करण्यात आलं आहे. त्यानंतर या जमिनीचा वापर हा दफनभूमी म्हणूनच करण्यात आला आहे असं वकील एम. आर. शमशाद यांनी स्पष्ट केलं.

१८५५ च्या दंगलीत जे मुस्लीम मारले गेले त्यांच्या कबरींवर राम मंदिराचं निर्माण करणार का? असा प्रश्न शमशाद यांनी श्रीराम जन्मभूमी तीर्थ ट्रस्टला लिहिलेल्या पत्रात केला आहे. अशा जागेवर भगवान रामाचे मंदिर कसे बांधणार असाही प्रश्न विचारण्यात आला आहे. १९४९ नंतर या ठिकाणी श्रीरामाची मूर्ती सक्तीने ठेवण्यात आली. तसंच १९९२ मध्ये जेव्हा मशिद पडली त्यानंतर परिसरात आणखी बदल झाला आहे असंही शमशाद यांनी स्पष्ट केलं.