ब्रिटनचा आरोप; प्रशासनाकडून मात्र इन्कार

सीरियातील रासायनिक हल्ल्यामागे अध्यक्ष बशर अल-असद यांचा हात असल्याचे सर्व पुराव्यांतून स्पष्ट झाल्याचे ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री बोरिस जॉन्सन यांनी म्हटले आहे. हा आरोप असाद प्रशासन आणि रशियाने फेटाळून लावला.

‘असद राजवटीनेच रासायनिक अस्त्रांच्या हल्ल्याद्वारे ७० हून अधिक नागरिकांचा बळी घेतला, हे मी पाहिलेल्या सर्व पुराव्यांवरून दिसून आले आहे. असाद यांनी आपल्याच देशातील नागरिकांविरोधात या बेकायदा अस्त्राचा वापर केला आहे.’ असे जॉन्सन यांनी सांगितले. ब्रसेल्स येथील सीरिया मदत परिषदेसाठी आलेल्या जॉन्सन यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

गेल्या वर्षी सीरिया प्रश्नावर लंडन येथे बैठक झाली होती. त्यात उद्ध्वस्त सीरियासाठी ११ अब्ज डॉलरचा मदतनिधी उभा करण्यात आला. त्याच धर्तीवर युरोपीय संघ आणि संयुक्त राष्ट्रांच्या सहकार्याने ही परिषद आयोजित करण्यात आली आहे.

सीरियात आतापर्यंत ३ लाख २० हजार लोकांचे बळी गेले असून मोठय़ा प्रमाणात लोक विस्थापित झाले आहेत. असाद यांनी पायउतार व्हावे, अशी मागणी बंडखोर व त्यांच्या आंतरराष्ट्रीय समर्थकांनी केली आहे.

असाद यांनी ती मागणी धुडकावली असून त्यांना बंडखोरांविरोधात रशियाचा पाठिंबा आहे. जिनेव्हामध्ये सीरियाप्रश्नी राजकीय तोडगा काढण्यावर भर देण्यात यावा, असे मत युरोपीय समुदायाचे परराष्ट्र प्रमुख फेडरिका मोघेरिनी यांनी व्यक्त केले आहे.

भयंकर घटना

सीरियातील हल्ल्यात २० मुलांसह ७२ जण ठार झाले आहेत. सीरियात युद्ध गुन्हे चालूच असल्याचे हे लक्षण आहे. रासायनिक हल्ल्याची घटना भयंकर असून, त्यातून आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कायद्याचे उल्लंघन झाले आहे, असे संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गट्रेस यांनी सांगितले. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत नकाराधिकार असलेल्या रशियाने मात्र सावध भूमिका घेतली आहे. सीरियाच्या हवाई हल्ल्यात दहशतवाद्यांच्या शस्त्र गोदामाला फटका बसल्याने ही घटना घडली. त्या वेळी रासायनिक वायू बाहेर पडले, असा रशियाचा दावा आहे.