पुणे : बारामती मतदारसंघातील प्रचार रविवारी सायंकाळी संपणार आहे. त्यामुळे बारामतीमध्ये रविवारी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभांचा धडाका पाहायला मिळणार आहे. गेल्या पाच दशकांपासून शरद पवार ज्या मैदानावर प्रचाराची सांगता सभा घ्यायचे, ते मैदान यंदा उपमुख्यमंत्री पवार यांनी मिळवले असून, सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराची सांगता सभा या मैदानावर होणार आहे.
बारामतीचे राजकारण १९६७ पासून ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याभोवती फिरते आहे. शरद पवार यांनी राजकीय जीवनाची सुरुवात केल्यापासून त्यांच्या किंवा त्यांच्या त्या त्या वेळच्या पक्षाच्या उमेदवाराची सांगता सभा बारामतीतील मिशन बंगला येथे होत आली आहे. राष्ट्रवादीतील फुटीनंतर मिशन बंगल्याचे मैदान यंदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मिळविले आहे. त्यामुळे शरद पवार यंदा त्या मैदानावर दिसणार नाहीत. त्याऐवजी मोरगाव रस्त्यावरील लेंडीपट्टा येथे पवार हे खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी सांगता सभा घेणार आहेत.
हेही वाचा >>> पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचा खर्च किती? खर्चावरून महायुतीतील घटक पक्षांमध्ये तू तू-मैं मैं…
मिशन बंगल्याचे मैदान आणि पवार कुटुंबीयांचे नाते गेली अनेक वर्षे टिकून होते. गेल्या वर्षी राष्ट्रवादीत फूट पडली आणि बारामतीतच पवार कुटुंबात उभी दरी निर्माण झाली. लोकसभा निवडणुकीत एकाच घरातून एकमेकांविरोधात उमेदवार देण्यापर्यंत ही दरी रुंदावत गेली. बारामती मतदारसंघातून महाआघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे विरुद्ध महायुतीच्या सुनेत्रा पवार यांच्यात थेट लढत होत आहे. कुटुंबातील महिला उमेदवार असल्या, तरी ही लढाई शरद पवार विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातच होत आहे. या दोघांचीही प्रतिष्ठा या निमित्ताने पणाला लागली आहे. गेले दीड महिना एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. अवघ्या देशाचे लक्ष या लढतीकडे लागले आहे. लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती किंवा अगदी नगर परिषदेची निवडणूक असो, शरद पवार यांच्याकडून नेहमीच बारामतीमधील मिशन बंगल्यानजीकच्या मैदानावर सांगता सभा घेत प्रचाराची सांगता केली आहे. अजित पवार गटाने यापूर्वीच हे मैदान आरक्षित केले. परिणामी, शरद पवार गटाला सांगता सभा अन्यत्र घ्यावी लागत आहे. ५० वर्षांत प्रथमच शरद पवार या मैदानावर सांगता सभा घेणार नाहीत. आता हे दोन्ही मातबर नेते रविवारी बारामतीत आपापल्या पक्षाची सांगता सभा घेत असून, त्यामध्ये ते बारामतीकरांना काय आवाहन करणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.
बारामतीत आज उडणार सभांचा धुरळा
– सकाळी नऊ वाजता भोरमधील राजा रघुनाथराव हायस्कूल मैदानात शरद पवार यांची सभा
– सकाळी दहा वाजता इंदापूर मार्केट कमिटी येथे शरद पवार यांची सभा
– दुपारी एक वाजता शरद पवार यांची प्रचार सांगता सभा मोरगाव रस्ता येथे लेंडी पट्टीच्या क्रिकेट मैदानावर
– आमदार रोहित पवार यांची बारामती शहरातून भव्य प्रचारफेरी – दुपारी तीन वाजता अजित पवार यांची सांगता सभा मिशन हायस्कूलचे मैदान