चीन भारताशी लढा देत आपल्या भूमीचे संरक्षण करेल, असे पीपल्स डेली या चिनी वृत्तपत्राने म्हटले आहे. आपल्या भूमीच्या संरक्षणासाठी प्रसंगी चीन युद्ध करेल, असा इशारादेखील ग्लोबल टाईम्सने दिला आहे. भारत आणि चीन सीमेवर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनच्या वृत्तपत्राने भारताला इशारा दिला आहे. यासाठी चीनमधील रणनितीतज्ज्ञांच्या विधानांचा संदर्भ ग्लोबल टाईम्सने दिला आहे.

‘चीन आपल्या सार्वभौमत्वासाठी आणि संरक्षणासाठी निकराने लढा देईल. यासाठी भारतीय सैन्याविरुद्ध युद्ध करावे लागले, तरी त्यासाठीदेखील चीन तयार आहे. प्रसंगी युद्ध करुन चीन आपल्या भूमीचे संरक्षण करेल,’ असे ग्लोबल टाईम्सने म्हटले आहे. ग्लोबल टाईम्सकडून कायम चीन सरकारची बाजू मांडणारे लिखाण केले जाते. चीन सरकारच्या अधिकृत भूमिकेसाठी ग्लोबल टाईम्स ओळखला जातो.

भारत आणि चीनचे सैन्य सिक्कीममध्ये आमनेसामने आल्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. ‘भारताने १९६२ मधील पराभव विसरु नये,’ असा इशारा काही दिवसांपूर्वी चीनकडून देण्यात आला होता. चीनच्या या विधानाला ‘भारत आता १९६२ सारखा राहिलेला नाही,’ असे म्हणत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी प्रत्युत्तर दिले होते. अरुण जेटली यांच्या विधानाला चीनमधील रणनितीतज्ज्ञ वांग देहूआ यांनी उत्तर दिले आहे. ‘चीनदेखील १९६२ सारखा राहिलेला नाही,’ असे देहूआ यांनी ग्लोबल टाईम्ससोबत बोलताना म्हटले आहे.

‘भारत आणि चीनमध्ये मोठा तणाव निर्माण झाला. दोन्ही देशांमधील तणावाची स्थिती व्यवस्थित न हाताळल्यास युद्ध होऊ शकते,’ असे ग्लोबल टाईम्सने म्हटले आहे. चीनमधील अभ्यासकांच्या विधानांचा संदर्भ देत, ‘चीन आपल्या भूमीच्या संरक्षणासाठी निकराचा लढा देऊ शकतो,’ असे ग्लोबल टाईम्सने म्हटले आहे. एका बाजूला थेट युद्धाची भाषा करणाऱ्या ग्लोबल टाईम्सने त्याचवेळी संवादाचादेखील मार्ग सुचवला आहे.

‘दोन्ही देशांनी विकासावर लक्ष केंद्रीत करावे. भारत आणि चीनने वादांकडे लक्ष न देता प्रगतीच्या दिशेने वाटचाल करावी,’ असे भारत-चीन संबंधांचे अभ्यासक झाओ गानचेंग यांनी ग्लोबल टाईम्ससोबत म्हटले आहे. ‘भारत आणि चीनमधील संबंधांचा फायदा अमेरिकेसारख्या देशाला होईल,’ असेदेखील गानचेंग यांनी म्हटले आहे. भारताने शत्रुत्वाची भावना टाळून चीनसोबत चांगले संबंध प्रस्थापित केल्यास ते दोन्ही देशांसाठी चांगले असेल, असेदेखील त्यांनी म्हटले.