कर्नाटकात भाजपाला शनिवारी फ्लोअर टेस्टला सामोरे जावे लागणार आहे. अशात काँग्रेसने एक ऑडियो क्लिप जारी करत भाजपाने आमच्या आमदाराला विकत घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. भाजपा नेते जर्नादन रेड्डी यांनी काँग्रेसच्या एका आमदाराला लाच देऊन विकत घेण्याचा प्रयत्न केला. हा आरोप सिद्ध करण्यासाठीच ही सीडी जारी करण्यात आली आहे.

जनार्दन रेड्डी आणि बेल्लारी रेड्डी हे दोघेही रेड्डी ब्रदर्स या नावे ओळखल्या जाणाऱ्या तीन भावांपैकी आहेत. बेकायदा खाणकाम प्रकरणी या दोघांनाही शिक्षा झाली होती. या दोघांचे भाऊ करुणाकर रेड्डी आणि सोमशेखर रेड्डी या दोघांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये यश मिळवत आपल्या जागा जिंकल्या आहेत. आता या रेड्डी ब्रदर्सपैकी जनार्दन रेड्डी यांनी काँग्रेस आमदाराला विकत घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

काँग्रेसने एका फोन कॉलची ऑडिओ क्लिप जारी केली आहे. यामध्ये जनार्दन रेड्डी यांनी कथित रुपाने काँग्रेसच्या आमदाराला विकत घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मात्र काँग्रेसचे सगळे आरोप फेटाळले आहेत. काँग्रेस डर्टी ट्रीक्स वापरत असल्याचे जावडेकर यांनी म्हटले आहे. एवढेच नाही तर कथित ऑडियो सीडी फेक आहे असेही त्यांनी म्हटले आहे.