मुलगा खून प्रकरणात अडकल्यानंतर फरार झालेल्या बिहारमधील जद(यू)च्या आमदार मनोरमा देवी यांच्या संपत्तीवर टांच आणण्याची परवानगी न्यायालयाने दिल्यानंतर पोलिसांनी या आदेशाच्या प्रती त्यांच्या तीन मालमत्तांवर चिकटवल्या आहेत.
अनुग्रहपुरी कॉलनी या उच्चभ्रू वस्तीतील मनोरमा देवी यांचे निवासस्थान, गया रेल्वे स्थानक आणि एका युवकाच्या खुनाबाबत पोलिसांनी रॉकी यादव याला जेथून अटक केली होती ते त्यांचे पती बिंदी यादव यांच्या बोधगया येथील मिक्सर संयंत्र या तीन ठिकाणी शुक्रवारी न्यायालयीन आदेशाच्या प्रती डकवण्यात आल्या.
मनोरमा देवी यांच्याविरुद्ध जारी करण्यात आलेले अटक वॉरंट परत करून पोलिसांनी न्यायालयाकडे त्यांच्या संपत्तीवर टांच आणण्याचा आदेश देण्याची विनंती केली. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एस.के. झा यांनी ती मान्य केली.
रॉकी यादव याचा शोध घेण्याच्या प्रक्रियेत अनुग्रहपुरी येथील घरात दारूच्या ६ बाटल्या सापडल्यामुळे उत्पादन शुल्क विभागाने हे घर सील केले आहे. मनोरमा देवी यांनी न्यायालयात जामिनासाठी अर्ज सादर केल्यानंतर हा आदेश देण्यात आला.