राहुल गांधी यांचे भाजपला प्रत्युत्तर; ‘जेएनयू’प्रकरणी राष्ट्रपतींची भेट; देशभरात निदर्शने
जेएनयूतील घटना आणि पतियाळा हाऊस न्यायालय संकुलातील हिंसाचार हा भारताच्या प्रतिमेला लागलेला बट्टा आहे, असे नमूद करून काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी, देशभक्ती आपल्या नसानसांत भिनलेली असल्याचे स्पष्ट केले. राहुल गांधी यांनी गुरुवारी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांची भेट घेऊन त्यांना या प्रकरणांमध्ये त्वरित हस्तक्षेप करण्याची विनंती केली.
देशात सध्या अराजक माजल्यासारखी स्थिती आहे आणि लोकशाही हक्कांची होणारी पायमल्ली रोखण्यासाठी मुखर्जी यांनी पावले उचलावी, अशी विनंती गांधी यांनी केली. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राष्ट्रपतींची भेट घेतली.
आपल्या शैक्षणिक संस्था नष्ट करणे आणि सर्व विद्यार्थ्यांच्या भावना चिरडून टाकणे हे सरकारचे काम नाही, संघ परिवार देशभरातील विद्यार्थ्यांवर विशिष्ट विचारसरणी लादण्याचा प्रयत्न करीत आहे, असेही गांधी म्हणाले.
भाजपने राहुल गांधी देशविरोधी असल्याचे वक्तव्य केले त्याला उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले की, देशभक्ती आपल्या नसानसांत भिनलेली आहे, गांधी कुटुंबीयांनी देशासाठी सातत्याने त्याग केला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. मुखर्जी यांना निवेदन दिल्यानंतर राहुल गांधी यांनी वार्ताहरांशी बोलताना हैदराबादमधील रोहित वेमुला या विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचा मुद्दाही मांडला. वेमुलाची हत्या हिंदुत्ववादी संघटनेने केल्याचा आरोपही यावेळी केला.

कन्हैयाच्या जामिनावर आज सुनावणी
नवी दिल्ली: देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलेला जवाहरलाल नेहरू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार याने तिहार तुरुंगात आपल्या जिवाला धोका असल्याचा दावा करून जामिनासाठी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्याच्या जामीन याचिकेवर न्यायालय शुक्रवारी सुनावणी करणार आहे.
पतियाळा हाऊस न्यायालयाच्या परिसरात वकिलांच्या एका गटाने बुधवारी हल्ला केलेल्या कुमारने अ‍ॅड. अनिंदिता पुजारी यांच्यामार्फत दाखल केलेल्या याचिकेत आपण निर्दोष असल्याचा दावा केला आहे. आपल्या जिवाला धोका असून, आपल्या जीवनाचे संरक्षण करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करण्याची आवश्यकता असल्याचे त्याने म्हटले आहे.
आपल्याला न्यायालयात हजर करणेही पोलिसांना कठीण होत असल्यामुळे आपल्याला तुरुंगात ठेवल्याने काहीच साध्य होणार नाही. आपल्याला आधीच न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आल्यामुळे आपल्या कोठडीतील चौकशीची काही गरज उरली नसल्याचेही त्याने म्हटले आहे.
ज्येष्ठ वकील सोली सोराबजी व राजू रामचंद्रन यांनी सादर केलेल्या या याचिकेवर आपण उद्या सुनावणी करू, असे न्या. जे. चेलमेश्वर व न्या. अभय सप्रे यांच्या खंडपीठाने सांगितले.