मुख्य निवडणूक आयुक्त पदावरुन पायउतार होणाऱ्या ओ पी रावत यांनी नोटाबंदीच्या निर्णयाचं उद्दिष्ट साध्य झालं नसल्याची टीका केली आहे. नोटाबंदीचा काळा पैशावर काही परिणाम झाला नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. निवडणुकीदरम्यान आयोगाने कारवाई करत मोठ्या प्रमाणात रोकड जप्त केल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

‘पाच राज्यांमधील (मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोरम) विधानसभा निवडणुकांदरम्यान आम्ही जप्त केलेली रक्कम जवळपास 200 कोटी होती’, अशी माहिती ओ पी रावत यांनी दिली आहे. यावरुन निवडणुकीदरम्यान येणारा पैसा हा प्रभावी लोकांकडून येत असून, अशा प्रकारच्या निर्णयांचा त्यांच्यावर काही परिणाम होत नसल्याचं स्पष्ट दिसत आहे असं ओ पी रावत यांनी म्हटलं आहे.

ओ पी रावत यांचं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दाव्याला धक्का देणारं आहे. नरेंद्र मोदी यांनी नोव्हेंबर 2016 मध्ये 500 आणि 1000 रुपयाच्या नोटा चलनातून बाद करताना यामुळे काळा पैसा उघड होईल तसंच भ्रष्टाचाराचं कंबरडं मोडेल असा दावा केला होता. मात्र ओ पी रावत यांच्या म्हणण्यानुसार, नोटाबंदीमुळे काळा पैशावर काहीच फरक पडलेला नाही.

शनिवारी ओ पी रावत मुख्य निवडणूक आयुक्त पदावरुन पायउतार झाले असून सुनील अरोरा पदभार स्विकारणार आहेत. 11 डिसेंबरला पाचही राज्यातील विधानसभा निवडणुकांची मतमोजणी पार पडणार आहे.