डोनाल्ड ट्रम्प यांची सारवासारव
अमेरिकेत मुस्लिमांना प्रवेश देण्यावर तात्पुरती बंदी घालावी, असे वक्तव्य केल्याने जगभरातून होणाऱ्या टीकेचे धनी ठरलेले डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी या बाबतची आपली भूमिका सौम्य केली आहे. या प्रश्नावर अंतिम निर्णय होईपर्यंत सदर प्रस्ताव म्हणजे केवळ सूचना होती, अशी सारवासारव ट्रम्प यांनी केली आहे.
आम्हाला गंभीर समस्या भेडसावत आहे, ही केवळ तात्पुरती बंदी करण्याची सूचना होती, कोणीही तसे केलेले नाही. या प्रश्नावर अंतिम निर्णय होईपर्यंत सदर प्रस्तावाची केवळ सूचना होती, असे रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्षपदाचे उमेदवार ट्रम्प यांनी फॉक्स नभोवाणीला सांगितले.
जगभरात इस्लामी मूलतत्त्ववादी दहशतवाद आहे, तुम्ही पॅरिसला जाऊ शकता, सॅन बर्नार्डिनोला जाऊ शकता, जगभरात कोठेही जाऊ शकता, त्यांना हे नाकारावयाचे असल्यास ते नाकारू शकतात, मात्र आपण ते नाकारू शकत नाही, असे ट्रम्प म्हणाले.
लंडनच्या महापौरपदी नव्याने निवड झालेले सादिक खान यांच्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला ट्रम्प उत्तर देत होते.
आपण अमेरिकेचे अध्यक्ष झालो तर पाकिस्तानी वंशाच्या महापौरांना अमेरिकेत येण्याची सवलत देऊ, असे स्पष्ट करताना ट्रम्प यांनी खान यांच्यावर टीका केली. इस्लामी दहशतवाद असल्याचे ते कदाचित नाकारतील, मात्र सध्या जगभरात सर्वत्र इस्लामी मूलतत्त्व दहशतवाद आहे, खान हे नाकारतील असे वाटते, असेही ते म्हणाले.
खान यांनी एका दूरचित्रवाणी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांना संदेश दिला आहे. त्यामध्ये म्हटले आही की, इस्लामबाबतची तुमची मते दुर्लक्ष करण्यासारखी आहेत, मुस्लीम असूनही पाश्चिमात्य देशांमध्ये वास्तव्य करणे शक्य आहे, मुस्लीम असूनही अमेरिकेवर प्रेम करणेही शक्य आहे, असे खान यांनी मुलाखतीत म्हटले आहे.
अमेरिकेत मुस्लिमांना प्रवेश देण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात यावी, असे वक्तव्य गेल्या डिसेंबर महिन्यात ट्रम्प यांनी केले होते आणि त्यावर जगभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या.