चीनने नेपाळलगत सीमेवर ११ इमारतींचे बांधकाम केल्याचे समोर आले आहे. हुमला जिल्ह्य़ातील या प्रकारामुळे नेपाळने चीनवर अतिक्रमणाचा आरोप केला आहे. दोन्ही देशांत सीमावाद निर्माण झाला असल्याचे नेपाळी प्रसिद्धीमाध्यमांनी म्हटले आहे.

नेपाळने काही वर्षांपूर्वी या भागात एक रस्ता बांधला तेव्हापासून सीमेवर असलेला खुणेचा खांबच नष्ट केला. आता चीनने तेथे इमारती बांधल्या आहेत. २००५ मध्ये या भागात झोपडय़ा होत्या. चीनने हा भूभाग आपला असल्याचा दावा केला आहे, अशी माहिती नामखा पालिकेचे प्रमुख बिष्णू बहादूर तमांग यांनी दिली. त्यांनी या भागास रविवारी भेट दिली होती.

दक्षिण सीमेवर चीनने १ कि.मी.  परिसरात अतिक्रमण करू या इमारती बांधल्या आहेत. नेपाळचे पथक सीमेवर पाहणीसाठी आले तेव्हा चीनच्या सुरक्षा दलाचे जवान ट्रक, टँकर व जीपने तेथे आले. त्यांनी नेपाळी अधिकाऱ्यांशी बोलून त्यांना चर्चेसाठी सीमेवर बोलावले.

तमांग यांनी सांगितले की, तो भाग नेपाळचाच आहे; पण चीनने नकाशे दाखवून तो त्यांचाच असल्याचे स्पष्ट केले. हुमला व नामखा या भागांत नेपाळच्या गृह मंत्रालयाने पथके पाठवली होती. त्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.

अमेरिकेच्या राजकारणात हस्तक्षेपाचा प्रयत्न

* वॉशिंग्टन : चीनने अमेरिकेसह इतर काही देशांच्या राजकारणात हस्तक्षेपाचा प्रयत्न केला असून, चीनमध्ये काही बनावट फेसबुक पाने तयार करून दिशाभूल करण्यात आली. खोटय़ा फेसबुक खात्यांच्या माध्यमातून चीनमधील काही जणांनी हा प्रयत्न केला असून आता फेसबुकने ही बनावट पाने काढून टाकली आहेत.

* आग्नेय आशियातील फिलिपिन्ससह काही देशांनाही चीनने लक्ष्य केले आहे. अमेरिकेत पीट बुटगिग, जो बायडेन, अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनार्थ या फेसबुक पानांवर लेखन केले गेले आहे. फेसबुकने यात थेटपणे चीन सरकारचे नाव घेतलेले नाही. वापरकर्त्यांनी त्यांची ओळख व ठिकाण आभासी खासगी नेटवर्कच्या माध्यमातून लपवण्याचा प्रयत्न केला.

* अमेरिकेतील निवडणुकीत परदेशी हस्तक्षेपाबाबत मंगळवारी ‘एफबीआय’ व अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाच्या सायबर सुरक्षा विभागाने धोक्याचा इशारा दिला असून यात अपमाहिती किंवा गैरप्रचार केला जात आहे असे सांगण्यात आले.

* अमेरिकी गुप्तचर अधिकाऱ्यांनी गेल्या महिन्यात असे सांगितले होते की, नोव्हेंबरमधील अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकीत चीन, रशिया व इराण हस्तक्षेप करीत आहेत. ट्रम्प हे बेभरवशाचे असून बायडेन हे विजयी व्हावेत असे चीनला वाटत असल्याचे गुप्तचर अधिकारी विल्यम इव्हानिना यांनी सांगितले.

* अमेरिकेतील निवडणुकीत चीनचा हस्तक्षेप दिसत असून रशियाच्या बाबतीत तर त्याचे स्पष्ट पुरावे आहेत. रशियाने बायडेन यांना बदनाम केले असून ट्रम्प यांना पाठिंबा दिला आहे. तेथील समाजमाध्यमे व दूरचित्रवाणी वाहिन्या ट्रम्प यांचा प्रचार करीत आहेत.