इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनच्या (इव्हीएम) विश्वासाहर्तेबाबत वाद सुरू असतानाच माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी एस कृष्णमुर्ती यांनी याबाबत महत्वपूर्ण भाष्य केले आहे. इव्हीएम मशीन्स सुरक्षित असल्याचा निर्वाळा त्यांनी दिला. मशीन कधीच चूक करू शकत नाही. व्यक्तीकडूनच चूक होते, असे ते म्हणाले. इव्हीएमचा वापर सुरू झाल्यापासून आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी तक्रार केली. ते सर्व पराभूत पक्षाचेच उमेदवार असल्याचे त्यांनी म्हटले.

मंगळवारी एका कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, तक्रार करणाऱ्यांनी इतिहासात डोकावून पाहिले पाहिजे. जयललिता आणि अमरिंदर सिंग हे सर्वांत प्रथम सर्वोच्च न्यायालयात गेले होते. पण पुढच्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर त्यांनी मौन बाळगले. यावेळी अमरिंदर सिंग हे इव्हीएमच्या माध्यमातूनच सत्तेवर आले.

जोपर्यंत या मशीनमध्ये छेडछाड करता येऊ शकते, हे कोणी सिद्ध करून देत नाही. तोपर्यंत माझा यावर विश्वास आहे. माझ्या अनुभवाप्रमाणे इव्हीएम सुरक्षित आणि विश्वासार्ह आहे, असेही त्यांनी म्हटले. निवडणुकीत इव्हीएममध्ये छेडछाड केल्याच्या वृत्ताबाबत बोलताना ते म्हणाले, मशीन्स कधी चुकीच्या नसतात. तर लोक चुकीचे असतात. ज्या लोकांकडे मशीन सांभाळण्याची जबाबदारी आहे त्यांच्यामुळे, किंवा हे मशीन हाताळण्यास जे अकार्यक्षम असतात, किंवा मशीन वापरताना झालेली चूक अथवा योग्य प्रशिक्षण न मिळाल्यास त्यात बिघाड होऊ शकतो.

इव्हीएममध्ये गडबड असल्याचे दिसून आल्यानंतर निवडणूक आयोगाने लोकांचा विश्वास वाढावा, त्यांचा दृष्टीकोन बदलावा म्हणून तात्काळ मशीन्स बदलल्याचे सांगत इव्हीएम देशासाठी गौरवास्पद आहे. या मशीनमुळे आपण कागद आणि मोठ्या प्रमाणात वेळ वाचवत असल्याचे म्हटले.