24 January 2021

News Flash

“शेतकऱ्यांना अशी वागणूक मिळणार असेल तर पुरस्कारांचं काय करु?”; ३० खेळाडूंची ‘पदकवापसी’ची तयारी

शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ माजी खेळाडूंनी सरकारला पदकं परत करण्याची घोषणा केली

केंद्रातील मोदी सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात सलग सातव्या दिवशी शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. पाच सदस्यांची समिती नेमून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्याचा सरकारचा प्रस्ताव ३५ शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी फेटाळला. त्यामुळे केंद्र सरकारने मंगळवारी विज्ञान भवनात बोलावलेल्या बैठकीची तिसरी फेरीही निष्फळ ठरली. या आंदोलनाच्या मुद्द्यावरुन आता शेतकऱ्यांना अनेक स्तरांमधून पाठिंबा मिळताना दिसत आहे. शेतकऱ्यांना पाठिंबा देणाऱ्यांच्या यादीमध्ये आता पद्मश्री तसेच अर्जुन पुरस्कार प्राप्त माजी खेळाडूंचाही समावेश झाला आहे. या माजी खेळाडूंनी सरकारला पदकं परत करण्याची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांविरोधात बळाचा वापर करणं कोणत्याही अर्थाने योग्य नसून आम्ही या गोष्टीचा विरोध करत आहोत, असं या खेळाडूंनी म्हटलं आहे.

नक्की वाचा >> “आंदोलनातील अनेकजण शेतकरी वाटत नाही”; केंद्रीय मंत्र्यांचे वक्तव्य

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, मागील काही दिवसांपासून भारताचे माजी बास्केटबॉलपटू आणि अर्जुन पुरस्कार विजेता सज्जन सिंह चीमा हे शेतकरी आंदोलनाला खेळाडूंचा पाठिंबा मिळवण्यासाठी मोर्चेबांधणी करत आहेत. चीमा हे पंजाबमधील आपल्या सहकारी खेळाडूंच्या संपर्कात असून शेतकऱ्यांना पाठिंबा दार्शवण्यासाठी सर्व खेळाडूंनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी त्यांना मिळालेले पुरस्कार राष्ट्रपतींकडे परत करावेत असं आपलं म्हणणं पटवून देत आहेत. चीमा यांच्या या मोहिमेला काही प्रमाणात यश आलं असून ३० हून अधिक माजी ऑलिम्पिक तसेच इतर मोठ्या स्पर्धांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करुन पदकं मिळवणाऱ्या खेळाडूंनी पाठिंबा दिला आहे. यामध्ये गुरमेल सिंह, सुरिंदर सिंग सोढी यांचही समावेश आहे. हे दोघेही १९८० च्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये हॉकीच्या संघाचे सदस्य होते. या संघाने या स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकलं होतं.

नक्की वाचा >> “अंबानींना टेलीकॉम, अदानींना एअरपोर्ट्स अन् शेतकऱ्यांवर लाठीचार्ज; मोदी है तो मुमकीन है”

पद्मश्री तसेच अर्जुन पुरस्कार विजेते कुस्तीपटू करतास सिंह, अर्जुन पुरस्कार विजेते माजी बास्केटबॉलपटू सज्जन सिंह चीमा, हॉकी खेळाडू राजबीर कौर यांच्यासहीत ३० खेळाडू राष्ट्रपतींकडे भेटीसाठी वेळ मागणार आहेत. राष्ट्रपतींनी वेळ न दिल्यास हे खेळाडू ५ डिसेंबर रोजी दिल्लीत जाऊन आपले पुरस्कार राष्ट्रपती भवनाबाहेर ठेऊन येणार आहेत. दिल्लीच्या दिशेने जाणाऱ्या शेतकऱ्यांना थांबवण्यासाठी केंद्र सरकराने आणि हरयाणा सरकारने वॉटर कॅनन आणि अश्रुधुराचा वापर करणं योग्य नव्हतं असं मत या खेळाडूंनी व्यक्त केलं आहे.

आम्ही सर्वजण शेतकऱ्यांचीच मुलं आहोत. शेतकरी मागील अनेक महिन्यांपासून शांततापूर्ण पद्धतीने आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांच्या या आंदोलनामुळे कोणालाही त्रास झालेला नाही. असं असतानाही ते दिल्लीला जाऊ लागले असता त्यांच्यावर वॉटर कॅनन आणि अश्रुधूर वापरण्यात आला. आमच्या ज्येष्ठांच्या आणि शेतकऱ्यांच्या पगड्या अशापद्धतीने उडवण्यात येणार असतील तर असे पुरस्कार आणि पदकं ठेऊन आम्ही काय करावे? आम्हाला असे पुरस्कार नकोत. आम्ही ते परत करणार आहोत, असं मत चीमा यांनी व्यक्त केलं.

नक्की वाचा >> तुम्हाला शेतकरी आंदोलनाविषयी बोलण्याचा अधिकार नाही; भारताने कॅनडाच्या पंतप्रधानांना सुनावले

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 2, 2020 10:08 am

Web Title: farmers protest 30 medal winners back farmers ready to return their awards scsg 91
Next Stories
1 Ind vs Aus : सलग दुसऱ्या सामन्यांत विराटने मोडला सचिनचा विक्रम, दिग्गजांच्या पंगतीत स्थान
2 यॉर्कर किंग नटराजनचं भारतीय संघाकडून पदार्पण
3 Ind vs Aus : टीम इंडियाने व्हाईटवॉशची नामुष्की टाळली, भारताचे युवा खेळाडू चमकले
Just Now!
X