येथील गोयांग शहरात बसस्थानकाच्या इमारतीत दुरुस्तीचे काम सुरू असताना लागलेल्या आगीत सहा जण जळून मरण पावले.
इमारतीच्या तळमजल्यावर वेल्डिंगचे काम सुरू असताना ही आग लागल्याचे ग्येऑनगी प्रांताच्या हा जोंग क्यून या अधिकाऱ्याने सांगितले.
या इमारतीत बहुपडदा चित्रपटगृह, शॉपिंग मॉल असून लोकांनी स्थानिक माध्यमांना सांगितले, की आगीची घटना घडली तेव्हा सकाळी नऊ वाजलेले होते, त्यामुळे लोकांची फारशी वर्दळ नव्हती. वीस मिनिटांत ही आग विझवण्यात आली. यात तीन जण गंभीर जखमी झाल्याचे हा जोंग क्यून यांनी सांगितले.
आपत्कालीन मदतकार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की या आगीत सहा जण मरण पावले आहेत. त्याआधी जखमींपैकी एक जण मरण पावल्याचे समजून हा आकडा सात असल्याचे सांगण्यात आले होते. सहा मृतांची ओळख अजून पटलेली नसून त्यात तीन पुरुष व तीन महिला असल्याचे समजते. त्यातील पाच जण दुसऱ्या मजल्यावर मृतावस्थेत सापडले.