छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी शनिवारी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांची गाडी स्फोटामध्ये उडवून दिली. या हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे पाच जवान शहीद झाले असून दोन जवान जखमी झाले आहेत. नक्षलवाद्यांनी सीआरपीएफची सुरुंगापासून संरक्षण देणारी गाडी उडवली.

सीआरपीएफचे जवान गस्तीवर निघालेला असताना हा हल्ला झाला. सीआरपीएफने मुरदाना भागात कॅम्प लावला होता. तिथे शनिवारी संध्याकाळी चारच्या सुमारास ही घटना घडली. हा भाग अवापल्ली पोलीस स्टेशनच्या हद्दीत येतो अशी माहिती पोलीस अधीक्षक मोहित गर्ग यांनी दिली.

कॅम्पपासून एक किलोमीटर अंतरावर झालेल्या शक्तीशाली स्फोटामध्ये या एमपीव्ही गाडीचा चक्काचूर झाला. या गाडीमध्ये सहा जण होते असे गर्ग यांनी सांगितले. घटनास्थळी तात्काळ अतिरिक्त कुमक पाठवण्यात आली आहे. छत्तीसगडमध्ये १२ आणि २० नोव्हेंबर अशा दोन टप्प्यांमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.