गोव्यातील काँग्रेसच्या फुटलेल्या १० आमदारांनी गुरुवारी संध्याकाळी दिल्लीत भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष जे.पी.नड्डा यांची भेट घेतली. काही वेळाने आमदारांचा हा गट भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची भेट घेणार आहे. या भेटीच्यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतही त्यांच्यासोबत होते. पुष्पगुच्छ देऊन या आमदारांचे स्वागत करण्यात आले.

भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीनंतर मंत्रिमंडळातून कोणाला वगळण्याचे किंवा पुढे काय करायचे यासंबंधी निर्णय घेण्यात येईल असे प्रमोद सावंत यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले. काँग्रेसमधील आमदारांचा हा गट फुटून भाजपामध्ये विलीन झाला आहे. बुधवारी रात्रीच प्रमोद सावंत १० आमदारांसोबत दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत.

गोवा विधानसभेचे विरोधीपक्षनेते चंद्रकांत कवळेकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमधील १० आमदारांचा गट सत्ताधारी भाजपामध्ये सहभागी झाला आहे. या फुटीमुळे ४० सदस्यांच्या गोवा विधानसभेत भाजपाचे संख्याबळ वाढून २७ झाले आहे. गोव्यात काँग्रेसने १५ जागा जिंकल्या होत्या. पण आता त्यांच्याकडे फक्त पाच आमदार राहिले आहेत. कर्नाटक पाठोपाठ गोव्यातही भाजपाने काँग्रेसला जोरदार झटका दिला आहे. आमदारांच्या या पक्ष बदलामुळे भाजपाची गोव्यातील स्थिती मजबूत झाली आहे.