अमेरिकेची श्रीलंकेच्या अध्यक्षांना सूचना

श्रीलंकेचे पंतप्रधान रनिल विक्रमसिंघे यांना अचानक पदावरून दूर केल्यानंतर तेथे असंतोष वाढला असून हिंसाचारही झाला आहे. या घटनेची दखल घेऊन अमेरिकेने अध्यक्ष मैत्रिपाल सिरिसेना यांना तातडीने पुन्हा तेथील संसदेचे अधिवेशन बोलावण्यास सांगितले आहे. लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सदस्यांना सरकारचे नेतृत्व कुणी करायचे याचा निर्णय घेऊ द्यावा, असे अमेरिकेने म्हटले आहे. सिरिसेना यांनी शुक्रवारी विक्रमसिंघे यांना पदावरून काढून त्यांच्या जागी महिंदा राजपक्षे यांची नेमणूक पंतप्रधान म्हणून केली होती. त्यामुळे श्रीलंकेत राजकीय पेच निर्माण झाला आहे.

दुसऱ्या दिवशी सिरिसेना यांनी संसद निलंबित करून तिचे अधिवेशन १६ नोव्हेंबपर्यंत लांबणीवर टाकत विक्रमसिंघे यांना बहुमत सिद्ध करता येऊ नये अशी परिस्थिती निर्माण केली होती. विक्रमसिंगे यांनी त्यांची हकालपट्टी बेकायदेशीर व घटनाबाह्य़ असल्याचे म्हटले होते. संसदेचे अधिवेशन तातडीने बोलावण्याची मागणी त्यांनी केली होती. विक्रमसिंघे यांची व्यक्तिगत सुरक्षा व वाहने अध्यक्ष सिरिसेना यांनी काढून घेतली होती. अध्यक्ष सिरिसेना यांनी संसद अध्यक्षांच्या सल्ल्याने संसदेचे अधिवेशन पुन्हा बोलवावे व लोकनियुक्त सदस्यांना सरकारचे नेतृत्व कुणी करायचे याचा निर्णय घेऊ द्यावा, असे अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्या हिथर नोएर्ट यांनी सांगितले.

अमेरिका श्रीलंकेतील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. कुठल्याही बाजूच्या लोकांनी धमकावणी व हिंसाचाराचा मार्ग वापरू नये, असेही त्यांनी म्हटले आहे. संयुक्त राष्ट्रांनीही श्रीलंकेतील परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे.  संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँतोनिओ गुटेरस यांनी श्रीलंका सरकारला लोकशाही मूल्ये व घटनात्मक तरतुदींचे पालन करून कायद्याचे राज्य राखण्यास सांगितले आहे. सर्वच बाजूंनी यात संयम पाळावा व परिस्थिती शांततेने हाताऴावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

रणतुंगा यांना अटक

कोलंबो : सुरक्षा रक्षकांनी केलेल्या गोळीबारात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याप्रकरणी श्रीलंकेचे माजी क्रिकेटपटू आणि पेट्रोलियममंत्री अर्जुन रणतुंगा यांना सोमवारी अटक करण्यात आली. रणतुंगा हे नुकतेच पदच्युत करण्यात आलेले पंतप्रधान रनिल विक्रमसिंघे यांच्या सरकारमध्ये पेट्रोलियममंत्री होते. ते रविवारी पेट्रोलियम मंत्रालयातील त्यांच्या कार्यालयात असताना महिंदा राजपक्षे यांच्या समर्थकांनी त्यांची वाट अडवून धरली. त्या वेळी रणतुंगा यांच्या सुरक्षा रक्षकांनी केलेल्या गोळीबारात एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले. या प्रकरणी सोमवारी रणतुंगा यांना अटक करण्यात आली. त्यांच्या दोन सुरक्षा रक्षकांना रविवारीच अटक झाल्याचे वृत्त होते.