इराकमधील स्थिती दिवसेंदिवस नाजूक होत चालली असून जिहादी बगदादपर्यंत पोहोचले आहेत. या ढासळत्या संरक्षण व्यवस्थेच्या पाश्र्वभूमीवर अमेरिका इराकमध्ये हवाई हल्ले करण्याचा गांभीर्याने विचार करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सोमवारपासून सुन्नी मुस्लीम स्टेट ऑफ इराक अँड लेव्हंट (आयएसआयएल)च्या अतिरेक्यांनी बगदादकडे कूच करण्यास सुरुवात केली असून बुधवारी त्यांनी उत्तरेकडील निनवेह आणि किरकक या शहरांचा ताबाही मिळवला आहे. इराकमधील सुरक्षा व्यवस्था निरंतर ढासळत चालली असून इराकी लोकप्रतिनिधीगृहाची आपत्कालीन बैठक बोलाविण्यात आली आहे. देशात आणीबाणी जाहीर करावी अशी मागणी पुढे आली आहे. मात्र त्यासाठी आवश्यक असलेले दोनतृतीयांश बहुमत मिळू शकेल का, याविषयी साशंकता आहे.
दरम्यान, इराकला लष्करी सहकार्य करण्याचा अमेरिकेचा विचार आहे. देशातील परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये म्हणून बगदादमधील जिहादी अतिक्रमित भागांवर ड्रोन हल्ले करणे किंवा अमेरिकेच्या फौजा पाठविणे या पर्यायांची व्यावहारिकताही तपासून पाहिली जात आहे.
मात्र येमेन, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानात अमेरिकेने केलेला हवाई हल्ल्यांचा वापर टीकेचे लक्ष्य ठरल्याने हा पर्याय निवडावा किंवा कसे, यावर खल सुरू आहे. त्यामुळेच इराकी सरकारसह एकत्रित समन्वयाने आयएसआयएलविरोधी आघाडी उभारता येईल का, हेही तपासून पाहिले जात आहे.