जर एखादा पती आपल्या पत्नीचा हुंड्यासाठी छळ करत असेल तर याचा अर्थ त्याच्या कुटुंबातील सर्वच लोक दोषी नसतील. कुटुंबातील प्रत्येक सदस्याला या प्रकरणात आरोपी करावे असा कुठेही कायदा नाही. कर्नाटक उच्च न्यायालयाने एका महत्वाच्या खटल्यात हा निकाल दिला आहे. एका महिलेने हुंड्यासाठी छळ केला जात असल्याची केलेली तक्रार फेटाळत न्या. एन के सुधींद्र राव यांनी एकत्र कुटुंबात राहणे अपराध नसल्याचे म्हटले.

न्यायमुर्ती म्हणाले, एकत्र कुटुंबात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने दुसऱ्या सदस्याला त्याचे स्वातंत्र्य दिले पाहिजे. यामध्ये कुटुंबात नव्याने दाखल होणाऱ्या सुनेचाही समावेश आहे. मात्र, न्यायालयाने महिलेकडून दाखल करण्यात आलेला पतीविरोधातील खटल्यावरील कारवाई सुरुच राहील, हे स्पष्ट केले आहे.

बागलकोट येथील एका महिलेचा फौजदार व्यक्तीश २३ मे २०१० रोजी विवाह झाला होता. विवाहानंतर दोघांमध्ये वाद होऊ लागला. महिलेने आपल्या पतीविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत तिने पतीसर आपले सासू-सासरे, दोन दीर, पतीचे काका आणि काकूंनाही आरोपी बनवले होते.

५० लाख रुपये रोख आणि सोन्याचे दागिने माहेराहून आणण्यासाठी पती आणि त्याच्या कुटुंबियांनी घरातून बाहेर काढले होते. लग्नावेळी पतीने महिलेच्या आई-वडिलांकडून ५ लाख रुपये रोख, ४१ ग्रॅम सोने त्याशिवाय मौल्यवान वस्तू हुंड्यात घेतले होते.

विवाहानंतर पती आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आपल्याला नोकरी करु दिली नाही. शिक्षिकेची नोकरी लागल्यानंतर पतीने स्वत:ची बदली करुन घेतली. जाणीवपूर्वक आपल्याला त्रास दिला, असे महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले होते.

महिलेची तक्रार ही अतिरंजित असल्याचे न्या. राव यांनी निर्देशनास आणून दिले. ते म्हणाले, तक्रारकर्त्याला आपली तक्रार करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असते. कुटुंबातील इतर सदस्य निर्दोष असतील तर त्यांची नावे आरोपी म्हणून घेतली जाऊ नये, याची काळजी महिलांनी तक्रार करताना घेतली पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला.