नॅशनल कॉन्फरन्स व पीपल्स डेमॉक्रॅटिक पार्टीनंतर आता काँग्रेसनेही जम्मू-काश्मीरमधील ‘ब्लॉक डेव्हलपमेंट काउंसिल’ (बीडीसी)च्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या निवडणुकीत सहभागी होण्यास काँग्रेसकडून नकार दर्शवण्यात आला आहे. सरकारद्वारे काश्मीरमधील स्थानिक नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलेले असल्याने काँग्रेसकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.जम्मू-काश्मीर प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रमुख गुलाम अहमद मीर यांनी बुधवारी याबाबत घोषणा केली. जम्मू-काश्मीरमधील ३१० ब्लॉकमध्ये २४ ऑक्टोबर रोजी बीडीसीची निवडणूक होत आहे.

गुलाम अहमद मीर यांनी म्हटले आहे की, काश्मीरमधील स्थानिक नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलेले आहे. राजकीय नेत्यांना स्थानबद्ध केलेले असताना निवडणूक कशी घेतल्या जाऊ शकते. बीडीसी निवडणुकीची घोषणा करण्याअगोदरच निवडणूक आयोगाने स्थानिक राजकीय पक्षांशी चर्चा करायला हवी होती. जर सरकारने स्थानिक नेत्यांची मुक्ताता केली असती तर, आम्ही देखील निवडणुकीत सहभागी झालो असतो. मात्र आता आम्ही या निवडणुकीवर बहिष्कार टाकत आहोत.

तसेच मीर यांनी हे देखील सांगितले  की, आम्हाला हे लक्षात आले आहे की बीडीसी निवडणूक केवळ सत्ताधारी पक्षाला फायदा व्हावा, यासाठीच घेतली जात आहे. आमचे नेते नजरकैदेत आहेत, त्यामुळे आमच्याकडे या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.

या अगोदर २ ऑक्टोबर रोजी नॅशनल कॉन्फरन्सने बीडीसी निवडणुकीच्या निर्णयावर आक्षेप नोंदवत आरोप केला होता की, राज्यातील बहुतांश नेते नजरकैदेत असताना निवडणूक घेणे लोकशाहीची सर्वात मोठी थट्टा आहे. त्याचवेळी काँग्रेसकडून हे स्पष्ट करण्यात आले होते की, जर सरकार ही निवडणूक घेण्याबाबत खरोखरच विचार करत आहे, तर त्यांनी अगोदर आमच्या नेत्यांची सुटका करावी, जे ५ ऑगस्टपासून नजरकैदेत आहेत.