लग्न समांरभात केल्या जाणाऱ्या वारेमाप खर्चावर चाप लावण्याची तरतूद असणारे विधेयक काँग्रेस खासदार रंजीन रंजन यांच्याकडून मांडले जाणार आहे. काँग्रेसच्या रंजीत रंजन लवकरच यासाठी संसदेत खासगी विधेयक मांडणार आहेत. या विधेयकाच्या माध्यमातून लग्न समारंभात पाच लाखांपेक्षा जास्त खर्च करण्यावर मर्यादा येणार आहे. यामुळे लग्न समारंभातील संपत्तीच्या ओंगळणाऱ्या प्रदर्शनाला आळा बसणार असल्याने रंजीत रंजन यांच्या प्रयत्नांचे कौतुक होते आहे. मात्र खुद्द रंजीत रंजन यांच्या लग्नात संपत्तीचे ओंगळवाणे प्रदर्शन घडले होते.

बिहारचे बाहुबली खासदार पप्पू यादव यांच्यासोबत रंजीत रंजन यांच्यासोबत ६ फेब्रुवारी १९९४ रोजी प्रेमविवाह झाला. त्यावेळी लग्न समारंभासाठी आलेल्या पाहुण्यांसाठी तब्बल २०० एकरवर मंडप उभारण्यात आला होता. या लग्न सोहळ्यात तब्बल १ लाखांपेक्षा अधिक लोक उपस्थित होते. त्या दिवशी शहरातील प्रत्येक चौक भव्यदिव्य पद्धतीने सजवण्यात आला होता, अशी माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.

६ फेब्रुवारी १९९४ रोजी संपन्न झालेल्या विवाह सोहळ्यासाठी शहरातील सर्व हॉटेल आरक्षित करण्यात आली होती. त्यावेळी जवळपास संपूर्ण शहराला लग्नाचे निमंत्रण देण्यात आले आहे, अशी आठवण अनेकजण सांगतात. रंजीत रंजन यांच्या लग्नासाठी मुलायम सिंह यादव, चौधरी देवी लाल, डिपी यादव आणि राज बब्बर यांच्यासह अनेक मोठे नेते आणि चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकार उपस्थित होते. त्यामुळे शहरात अनेक महागड्या गाड्या दिसत होत्या. पूर्णिया महाविद्यालय आणि आसपासच्या मैदानांमधील जवळपास २०० एकर परिसरात लग्न समारंभ आयोजित करण्यात आला होता.

रंजीत रंजन यांचे वडिल पाटण्याच्या गुरुद्वाऱ्यात ग्रंथी होते. रंजीत यांचे वडिल त्यांच्या भावासह पाटण्यात, तर उर्वरित कुटुंब जालंधरला राहायचे. विशेष म्हणजे लग्नाच्या दिवशी रंजीत रंजन यांचे संपूर्ण कुटुंब एका चार्टड प्लेनने जालंधरहून पाटण्याला आला होता. रंजीत रंजनदेखील जालंधरहून चार्टड प्लेननेच पाटण्यात दाखल झाल्या होत्या.

लग्न समारंभात खासदार पप्पू यादव यांनी कोणतीच उणीव ठेवली नव्हती. त्यावेळी अपक्ष आमदार असलेल्या पप्पू यादव यांची प्रचंड दहशत होती. पुढे पप्पू यादव यांनी लोकसभा निवडणूक लढवली आणि ते खासदार झाले. ‘त्यावेळी करण्यात आलेली संपूर्ण व्यवस्था पप्पू यादव यांनी केली होती. यातील कोणताही खर्च आमच्या बाजूने करण्यात आला नव्हता. आम्ही ज्या चार्टड प्लेनने पाटण्यात आलो, ते प्लेनदेखील त्यांच्याकडूनच पाठवण्यात आले होते,’ असे स्पष्टीकरण रंजीत रंजन यांनी दिले आहे.