संचालनालयाचे आरोपपत्र दाखल

आयआरसीटीसी हॉटेल प्रकरणात राजद प्रमुख लालूप्रसाद यादव, त्यांच्या पत्नी राबडीदेवी व इतरांवर सक्तवसुली संचालनालयाने पहिले आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, त्यांचे पक्ष सहकारी पी. सी. गुप्ता, त्यांच्या पत्नी सरला गुप्ता, लारा प्रोजेक्ट्स व इतर दहा जणांचा समावेश आहे. पीएमएलए कायद्यानुसार विशेष न्यायालयापुढे अभियोक्तयांनी हे आरोपपत्र दाखल केले आहे.

सक्तवसुली संचालनालयाने सांगितले, की प्रसाद व आयआरसीटीसी अधिकाऱ्यांनी संगनमत करून अधिकारांचा गैरवापर करीत पुरी व रांची येथील रेल्वेची दोन हॉटेल्स मे. सुजाता हॉटेल प्रा. लि या कोचर यांच्या मालकीच्या कंपनीस उप भाडेपट्टय़ाने दिली. त्या बदल्यात पी. सी. गुप्ता यांच्या मे. डिलाइट मार्केटिंग कंपनी प्रा. लि या कंपनीच्या नावावर पाटण्यातील एक भूखंड देण्यात आला.

सक्तवसुली संचालनालयाने या प्रकरणी ४४ कोटींची मालमत्ता जप्त केली असून सीबीआयनेही याबाबत आरोपपत्र आधीच दाखल केले आहे. सीबीआयच्या एफआयआरमध्ये लालूप्रसाद यादव यांनी यूपीए १ सरकारमध्ये रेल्वेमंत्री असताना आयआरसीटीसीच्या दोन हॉटेल्सचा ठेका २००४ मध्ये एका कंपनीला देताना भूखंडाच्या स्वरूपात लाच घेतल्याचे म्हटले आहे. ही लाच प्रेमचंद गुप्ता यांच्या पत्नी सरला गुप्ता यांच्या बेनामी कंपनीच्या नावाखाली घेण्यात आली. गुप्ता हे सुद्धा माजी केंद्रीय मंत्री आहेत.

लालू यांच्या जामिनाचा कालावधी वाढवण्यास नकार

रांची : बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना चारा घोटाळय़ात हंगामी जामिनाचा कालावधी वाढवून देण्यास  झारखंड उच्च न्यायालयाने नकार दिला असून, त्यांना ३० ऑगस्टपर्यंत सीबीआय न्यायालयापुढे हजेरी लावण्यास सांगितले आहे.  लालू प्रसाद यांच्यावर वैद्यकीय उपचार करायचे असून, हंगामी जामिनाचा कालावधी तीन महिने वाढवून देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती, ती न्या. अप्रेश कुमार सिंह यांनी फेटाळली. लालू प्रसाद यांनी ३० ऑगस्टपर्यंत सीबीआय न्यायालयात हजर व्हावे व लालू प्रसाद यांना राज्य सरकारने वैद्यकीय तपासणी सेवा पु रवावी असा आदेश त्यांनी दिला.

लालू प्रसाद यांची बाजू मांडताना अभिषेक मनू सिंघवी यांनी सांगितले, की लालू प्रसाद यांना मूत्रपिंडातील खडय़ांचा आजार असून त्यांच्या पूरस्थ ग्रंथी वाढल्या आहेत, त्यावर उपचारासाठी जामिनाचा कालावधी तीन महिने वाढवून देण्यात यावा.

सीबीआयचे वकील राजीव सिन्हा यांनी जामीन कालावधी वाढवण्याची मागणीस आक्षेप घेताना  सांगितले, की राजद नेते लालू प्रसाद यादव यांना १२ आठवडे उपचारासाठी देण्यात आले होते. राजेंद्र इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेस या रांचीतील संस्थेत वैद्यकीय उपचार उपलब्ध आहे. न्यायालयाने १० ऑगस्टला लालूंचा हंगामी जामीन वैद्यकीय कारणास्तव २० ऑगस्टपर्यंत वाढवला होता.

नंतर १७ ऑगस्टला तो पुन्हा २७ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आला. त्याआधी ११ मे रोजी लालू यांना सहा आठवडय़ांचा हंगामी जामीन देण्यात आला व नंतर तो १४ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आला होता. लालू प्रसाद यांना चारा घोटाळय़ातील चार प्रकरणांत दोषी ठरवण्यात आले आहे.