योग आणि युद्धाच्या एकीकरणामुळे भारतात आनंद पसरेल आणि पाकिस्तानातील दहशतवाद्यांचा खात्मा होईल, असे योगगुरु रामदेव बाबा यांनी म्हटले आहे. मी योग आणि युद्धाचे एकाचवेळी समर्थन करतो, असेदेखील रामदेव बाबा पुढे बोलताना म्हणाले. भारत आणि पाकिस्तानमधील संबंध ताणले गेल्याच्या पार्श्वभूमीवर रामदेव बाबा यांनी हे विधान केले आहे.

योग आणि युद्धाचे समर्थन करताना रामदेव बाबा यांनी या दोन्ही गोष्टी एकाचवेळी व्हायला हव्यात असे म्हटले. ‘हिंदुस्तानात योग व्हावा आणि सीमेवर पाकिस्तानासोबत योग आणि युद्ध व्हावे. योग केल्याने हिंदुस्तानात आनंद पसरेल आणि सीमेवरील योग आणि युद्धामुळे पाकिस्तानमधील दहशतवाद्यांना कंठस्नान घालता येईल,’ असे रामदेव बाबा यांनी म्हटले.

भारत आणि पाकिस्तानमधील संबंध सध्या मोठ्या प्रमाणात ताणले गेले आहेत. कुलभूषण जाधव प्रकरण आणि सीमारेषेवरील वाढता तणाव यामुळे दोन्ही देशांमधील संवादाची दरी रुंदावली आहे. पाकिस्तानकडून वारंवार सीमारेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात येत आहे. त्यामध्ये भारतीय जवान शहीद होत असल्याने देशात संतापाचे वातावरण आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी पाकिस्तानी सैन्याने दोन भारतीय जवानांच्या मृतदेहांची विटंबना केल्याने भारतीयांमध्ये संतापाची भावना आहे.

कुलभूषण जाधव प्रकरणातही पाकिस्तानने आडमुठी भूमिका घेतली आहे. कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली आहे. विशेष बाब म्हणजे भारताने १६ वेळा कॉन्स्युलर अॅक्सेससाठी विनंती करुनही पाकिस्तानने भारतीय राजदूतांना जाधव यांना भेटण्याची परवानगी नाकारली आहे. पाकिस्तानच्या या आडमुठ्या भूमिकेला आंतरराष्ट्रीय न्यायालयानेदेखील चपराक लगावली आहे. कुलभूषण जाधव यांना सुनावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. पाकिस्ताने हेरगिरीच्या आरोपाखाली कुलभूषण जाधव यांनी फाशीची शिक्षा सुनावली आहे.