विमानात बसण्याचं स्वप्न आपल्यापैकी प्रत्येकाने कधी ना कधी पाहिलं असेल. मात्र इंदौरजवळील एका लहानश्या गावातील शाळेमध्ये शिकणाऱ्या मुलांचं हे विमानात बसण्याचं स्वप्न त्यांच्या मुख्यध्यापकांनी पूर्ण केलं आहे. येथील देवास तालुक्यातील एका लहानश्या खेड्यातील शाळेच्या मुख्यध्यापकांनी आपल्या कमाईतून ठराविक पैसे बाजूला काढून शाळेतील मुलांना स्वत:च्या खर्चाने विमानाने दिल्ली फिरवून आणली.

बिजापूर गावातील शाळेत शिकणाऱ्या सहावी, सातवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना इंदौर ते दिल्ली अशी हवाई सफर घडवणाऱ्या मुख्यध्यापकाचे नाव आहे किशोर कणसे. किशोर व्हॅलेंटाइन्स डेच्या दिवशी मुलांना इंदौरवरुन विमानाने दिल्लीला घेऊन गेले. पहिल्यांदाचा विमानाने प्रवास करणाऱ्या मुलांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.

आम्ही मैदानातून विमान बघायचो तेव्हा…

तीन शिक्षक आणि काही निवडक विद्यार्थ्यांच्या दिल्ली दौऱ्याच्या विमानप्रवासाचा संपूर्ण खर्च मुख्यध्यापक कणसे यांनी स्वत:च्या खिशातून केला होता हे विशेष. बिजापूरच्या शाळेतील मुले टाइमपास म्हणून कागदाची विमाने बनवून उडवायची. अनेकदा मधल्या सुट्टीमध्ये ही मुले कागदाची विमाने उडवण्याच्या स्पर्धाही लावायची. मात्र आता याच मुलांना त्यांच्या मुख्यध्यापकांनी थेट विमानातून दिल्ली दौरा घडवल्याने या मुलांसाठी आकाश ठेंगणे झाले आहे. “आम्ही मैदानामधून आकाशात उडणारे विमान पहायचो तेव्हा ते अगदी लहान दिसायचे,” असं सहावीत शिकणारा तोहिद शेख सांगतो.

किती खर्च केला?

“ग्रामीण भागातील अनेक मुलांनी साधा ट्रेननेही कधी प्रवास केलेला नसतो. त्यामुळे विमानातून प्रवास करण्याचा तर ते स्वप्नातही विचार करणार नाहीत. मात्र लहान वयातच त्यांनी विमान प्रवासाचा अनुभव घ्यावा असं मला वाटत होतं. ते शाळा संपल्यानंतर स्वत:च्या आयुष्यात पुढे जातील मात्र या प्रवासाची आठवण कायम सोबत ठेवतील,” असं या प्रवासाबद्दल बोलताना कणेस सांगतात. कणसे यांनी स्वत:च्या बचत केलेल्या पैशांपैकी ६० हजारहून अधिक रुपये या दौऱ्याच्या तिकीटांसाठी खर्च केले. तिकीटांची मागणी कमी असताना आपण ती बूक केल्याचे कणसे सांगतात.

कशी सुचली कल्पना?

मागील वर्षीच कणसे यांच्या डोक्यात मुलांना विमानातून फिरायला घेऊन जाण्याची कल्पना आली होती. मात्र त्यावेळी पुरेसे पैसे नसल्याने ते मुलांना आग्र्याला ट्रेनने घेऊन गेले होते. “परतीच्या प्रवासात मुले खूप आनंदात होती. त्यावेळी त्यांनी आता आम्हाला विमानाने प्रवास करायचा आहे सर” असं सांगितल्याचं मला आजही आठवत असल्याचे कणसे म्हणतात. त्यामधून त्यांनी या दौऱ्याचे आयोजन केलं होतं.