केंद्र सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयाचा फटका मराठा मोर्चालाही बसला आहे. दिल्लीत २० नोव्हेंबररोजी निघणारा मराठा समाजाचा मोर्चा पुढे ढकलण्यात आल्याचे वृत्त वृत्तवाहिन्यांनी दिले आहे. आता हा मोर्चा कधी निघणार हे मात्र अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही.

मराठा समाजाला आरक्षण, कोपर्डी प्रकरणातील नराधमांना फाशी अशा विविध मागण्यांसाठी राज्यभरात मराठा समाजाच्या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. हिवाळी अधिवेशनाच्या कालावधीत दिल्लीतही मराठा मोर्चाचे आयोजन करण्यात येणार होते. केंद्र सरकारवर दबाव आणण्याच्या दृष्टीने या मोर्चाची जोरदार तयारीही सुरु होती. दिल्लीत निघणा-या मराठा मोर्चात पंतप्रधान आणि राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना निवेदन देण्यात येणार होते. या मोर्चामध्ये  दिल्ली, जम्मू, पानिपत या शहरांसह उत्तर भारतातील अनेक राज्यांमधील मराठा बांधव उपस्थित राहतील असा अंदाज वर्तवला जात होता.

केंद्र सरकारने गेल्या आठवड्यात नोटबंदीचा निर्णय जाहीर केला आणि मराठा समाजाच्या मोर्चाच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. मोर्चासाठी महाराष्ट्रातूनही अनेक जण दिल्लीत जाणार होते. मात्र नोटबंदीमुळे आता दिल्लीतील प्रवासाचा खर्च कसा करायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. याशिवाय बँकांमधूनही पैसे काढण्यासाठी असंख्य अडचणींचा सामना करावा लागत असल्याने या मोर्चात सहभागी होणे कठीण झाले होते. या पार्श्वभूमीवर दिल्लीत मराठा मोर्चाचे आयोजन करणा-या समितीची बैठक पार पडली. या बैठकीत मोर्चा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.