सर्वोच्च न्यायालयाच्या मध्यस्थ समितीपुढे

फैझाबाद : अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशिदीबाबतचा जमिनीचा वाद मध्यस्थीतून सोडवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीपुढे या खटल्यातील २५ पक्षकारांनी बुधवारी हजेरी लावली.

पक्षकार आणि त्यांचे वकील मिळून ५०हून अधिक लोकांनी या समितीच्या तीन सदस्यांची येथील अवध विद्यापीठाच्या परिसरात भेट घेतली. उत्तर प्रदेशचे महाधिवक्ता राघवेंद्र सिंह आणि अतिरिक्त महाधिवक्ता मदनमोहन पांडे हेही बैठकीला हजर होते.

अयोध्येतील वादग्रस्त जागेबाबत सौहार्दपूर्ण तोडगा काढण्याची शक्यता पडताळून पाहण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश एफ. एम. कलिफुल्ला यांच्या नेतृत्वाखाली या समितीला न्यायालयाने आठ आठवडय़ांचा वेळ दिला आहे. समितीचे आणखी दोन सदस्य आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर आणि ज्येष्ठ वकील श्रीराम पांचू हे मंगळवारी फैझाबादमध्ये पोहोचले असून ते येथे तीन दिवस राहतील अशी अपेक्षा आहे.

सकाळी १० वाजता सुरू झालेल्या या बैठकीत ५०हून अधिक लोक सहभागी झाले होते आणि चर्चा सुसंवादी वातावरणात झाली, असे रामजन्मभूमी पुनरुद्धार समितीचे स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी सांगितले.

फैझाबाद प्रशासनाने समितीच्या वतीने २५ पक्षकारांना बैठकीची सूचना पाठवली होती. त्यानुसार निर्मोही आखाडय़ाचे महंत दिनेंद्र दास, रामलला विराजमानतर्फे त्रिलोकी नाथ पांडे, दिगंबर आखाडय़ाचे महंत सुरेश दास, हिंदू महासभेतर्फे स्वामी चक्रपाणी व कमलेश तिवारी हे बैठकीत उपस्थित होते. पक्षकार इक्बाल अन्नारी, मोहम्मद उमर व हाजी महबूब हे बैठकीत सहभागी झाले, तर जमियत उलेमा-इ-हिंदतर्फे मौलाना अशद रशिदी यांनी प्रतिनिधित्व केले.