करोनावर मात करणाऱ्या उपायांचा दावा; आयुष मंत्रालयाने तपशील मागवला

योगगुरू रामदेव बाबा यांच्या ‘पतंजली आयुर्वेद’ने करोना सात दिवसांत पूर्णपणे बरा करणारे पहिले आयुर्वेदिक औषध शोधल्याचा दावा मंगळवारी केला. मात्र, त्यानंतर आयुष मंत्रालयाने तातडीने जारी केलेल्या आदेशाद्वारे पतंजलीला या औषधाची जाहिरात करण्यास मनाई करण्यात आली. ‘आयुष’ने पतंजलीकडे या औषधातील घटकांचा तपशील मागितला असून, जोवर त्याची पडताळणी होत नाही, तोवर ही बंदी कायम राहणार आहे.

रामदेवबाबा यांनी हरिद्वारमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत ‘कोरोनील’ आणि ‘श्वसरी’ औषधांची करोनाबाधित रुग्णांवर चाचणी करण्यात आल्याचे आणि ही औषधे १०० टक्के परिणामकारक असल्याचे स्पष्ट झाल्याचा दावा केला. या औषधांमुळे केवळ सात दिवसांत करोना पूर्णपणे बरा होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

या औषधाची परिणामकारकता तपासण्यासाठी पतंजलीने किती नमुन्यांची तपासणी केली, हे वैद्यकीय प्रयोग कोणत्या ठिकाणी झाले, कोणत्या रुग्णालयांत हे संशोधन झाले, त्यासाठी संस्थात्मक तत्त्व समितीने परवानगी दिली होती काय, याचा तपशील पतंजलीकडे मागण्यात आला आहे, असे आयुषतर्फे सांगण्यात आले.

हरिद्वारमध्ये पतंजलीचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण यांनी सांगितले की, पतंजलीचे करोना संच ५४५ रुपयांना उपलब्ध करून दिले जाणार आहेत. या करोना संचामध्ये ३० दिवस पुरेल इतके औषध असेल. करोनाचा संसर्ग होऊ नये याची खबरदारी म्हणूनही या संचाचा वापर करता येऊ शकतो, असा दावाही पतंजलीने केला आहे. हरिद्वारस्थित दिव्या फार्मसी आणि पतंजली आयुर्वेद लि. यांनी औषधांचे उत्पादन केले आहे. पतंजली संशोधन संस्था आणि जयपूरस्थित राष्ट्रीय वैद्यकीय

विज्ञान संस्था यांच्या संयुक्त संशोधनातून औषध तयार करण्यात आले आहे, असे रामदेवबाबा यांनी सांगितले.

रामदेवबाबांचा दावा..

करोना किटमध्ये कोरोनील, श्वसरी आणि अनू तेल या तीन औषधांचा समावेश आहे. ही औषधे प्रतिकारशक्ती वाढविणारी नाहीत तर करोना पूर्णपणे बरा करणारी आहेत. करोनाबाधित २८० रुग्णांवर या औषधांचा प्रयोग करण्यात आला. त्यापैकी ६९ टक्के रुग्ण तीन दिवसांत बरे झाले. हे औषध घेतल्यावर सात दिवसांत रुग्ण पूर्ण करोनामुक्त होतो.

आयुष मंत्रालय म्हणते..

पतंजलीच्या या औषधांबाबत केले जाणारे दावे आणि त्यासाठी घेतलेल्या शास्त्रीय चाचण्या यांची कोणतीही माहिती नाही. औषधांची जाहिरात करण्यावर (ज्यात आयुर्वेदिक औधषांचाही समावेश होतो) ‘औषधे आणि जादुई उपचार (आक्षेपार्ह जाहिरात) कायद्या’नुसार निर्बंध आहेत, असे पतंजलीला बजावण्यात आले आहे.