काँग्रेसने आजवर प्रत्येक निवडणूकी आधी जाहीर केलेल्या आपल्या जाहीरनाम्यातील आश्वासने कधीच पूर्ण केली नाहीत त्यामुळे पक्षाच्या जाहीरनाम्याची पवित्रताच त्यांनी नष्ट करून टाकली असल्याचे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ते झारखंडमधील प्रचारसभेत बोलत होते.
कोणत्याही राजकीय पक्षाने आपल्या जाहीरनाम्यातील आश्वासनांबद्दल कटीबद्ध असले पाहिजे, काँग्रेसच्या याआधीच्या जाहीनाम्यामध्ये महागाई कमी करण्याचे आश्वासन दिले होते परंतु, महागाई काही कमी झालेली दिसली नाही. त्यामुळे अशी खोटी आश्वासने देणाऱया जाहीरनाम्यांपासून तुम्ही सावध राहण्याचे आवाहनही मोदींनी जनतेला केले.
जाहीरनाम्यातील खोटी आश्वासने टाळण्यासाठी मोदींनी यावेळी निवडणूक आयोगाला एक आवाहनही केले. मोदी म्हणाले की, “प्रत्येक उमेदवाराच्या आर्थिकबाबींचा तपशीलवाराची नोंद जशी निवडणूक आयोगाकडे करावी लागते, तसेच सत्तेत असलेल्या पक्षाने आपल्या जाहीरनाम्यातील कीती आश्वासने पूर्ण केली याचा लेखाजोखाही आयोगाने संबंधित पक्षाकडे मागावा. त्यामुळे कोणताही पक्ष खोटी आश्वासने देणार नाही.”