आसामच्या हैलाकांडीमध्ये रविवारी संचारबंदी लागू असताना एका मुस्लीम रिक्षा चालकाने जीवाचा धोका पत्करुन गर्भवती महिलेला वेळेत रुग्णालयात पोहोचवले. त्यामुळे या महिलेची सुखरुप प्रसूती होऊ शकली. मकबूल हुसैन असे या रिक्षा चालकाचे नाव आहे. हैलाकांडीमध्ये शुक्रवारी सांप्रदायिक तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे या भागात पोलिसांनी संचारबंदी लागू केली होती.

रविवारी नंदिता दास या महिलेला अचानक प्रसुती कळा सुरु झाल्या. दोन गटांमध्ये झालेल्या संघर्षामुळे संपूर्ण जिल्ह्यात संचारबंदी लागू होती. रस्त्यावर एकही गाडी धावत नव्हती तसेच रुग्णवाहिकाही उपलब्ध नव्हती. नंदिता नवरा रुबॉन मदतीसाठी सतत फोन फिरवत होता. प्रसूती कळांमुळे नंदिताची परिस्थिती खराब होती. लगेच मदत मिळेल असे सांगून रुबॉन तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होता.

गावापासून हॉस्पिटल १२ किलोमीटर अंतरावर होते. संचारबंदी असल्यामुळे कोणीही धोका पत्करायला तयार होत नव्हतं. त्यावेळी शेजारी राहणारा मकबूल हुसैन या कुटुंबाच्या मदतीला धावून आला. मकबूलने आपल्या रिक्षामधून महिलेला रुग्णालयात पोहोचवले. मोकळया रस्त्यावरुन मी वेगाने रिक्षा पळवत होतो. वेळेत रुग्णालयात पोहोचू की नाही याबद्दल माझ्या मनात धास्ती होती. पण मी त्यांना काळजी करु नका असे सांगून धीर देत होतो असे मकबूलने सांगितले. अखेर संध्याकाळी ५.३० वाजता ते रुग्णालयात पोहोचले. नंदिताने एका सुदृढ मुलाला जन्म दिला. तणावाच्या काळात या मुलाचा जन्म झाल्याने जोडप्याने या मुलाचे नाव ‘शांती’ ठेवले आहे.