आसाम व ईशान्येकडील इतर राज्यांत १९७० पासून काँग्रेस सरकारच्या धोरणामुळे घुसखोरी होत राहिली त्याचा फटका तेथील लोकांना बसला आहे, पण आता चौकीदारच घुसखोरीपासून तुमचे संरक्षण करील, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील प्रचार सभेत केले.

काँग्रेसने आसामचा वेळोवेळी विश्वासघात कसा केला हे सांगतील. देशाच्या हिताविरोधात काम करणाऱ्यांना आसामची जनता पाठिंबा देणार का, असा सवाल करून पंतप्रधान म्हणाले की, काँग्रेसने कधीच देशाच्या व आसामच्या विकासाचा विचार केला नाही. काँग्रेसने लोकांना फसवले पण चौकीदार लोकांचे घुसखोरीपासून रक्षण करील. जनसंघ व अटल बिहारी वाजपेयी यांच्यासारख्या नेत्यांनी बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढय़ास पाठिंबा दिला होता. त्या वेळी इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या.

सरकारच्या कामगिरीबाबत ते म्हणाले, की चौकीदारानेच पीएम श्रमयोगी मानधन योजना सुरू केली, ती चहामळ्यात काम करणाऱ्या लोकांना लागू आहे. यातील लोकांना वयाच्या साठीनंतर महिन्याला तीन हजार रुपये मिळणार आहेत.

विरोधकांना धडा शिकवा

दरम्यान अरुणाचल प्रदेशातील आलो येथील सभेत ते म्हणाले, की अरुणाचल प्रदेशातील लोकांनी देश सुरक्षित ठेवणाऱ्या चौकीदाराला मते द्यावीत. देशाची आर्थिक वाढ व यश पाहून विरोधक निराश झाले आहेत. काँग्रेस हा जुना पक्ष असला तरी तो भ्रष्टाचाराने बरबटलेला आहे. देशातील लोकांना गृहीत  धरण्याची त्यांना सवय लागली आहे. जेव्हा देश चांगल्या गोष्टीत यश मिळवतो तेव्हा त्यांना आनंद होत नाही. भारताच्या यशकथांनी सर्व सामाजिक व आर्थिक गटातील लोकांना आनंद वाटतो, पण काँग्रेस व विरोधकांना मात्र त्यामुळे नाउमेद झाल्यासारखे वाटते. जेव्हा देशाने दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ला केला तेव्हा विरोधकांची भूमिका काय होती हे तुम्हाला माहिती आहे. आमच्या वैज्ञानिकांनी मोठे काम केले तेव्हा त्यांनी त्यांची कामगिरीही टीकेने लहान करून टाकली. अशा विरोधी पक्षांना आगामी निवडणुकीत धडा शिकवा.

‘भाजपचा शिशुपाल मोदींच्या शंभर चुका’ पुस्तिकेतून

प्रदेश काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारच्या पाच वर्षांतील कारभाराचा पंचनामा करणारी ‘भाजपचा शिशुपाल  मोदींच्या शंभर चुका’ या शीर्षकाची पुस्तिका प्रकाशित केली आहे. ५६ इंच छातीच्या बाता मारणाऱ्या नरेंद्र मोदी यांनी गेल्या पाच वर्षांत फक्त आश्वासनांचे इमले बांधले, असा हल्लाबोल करण्यात आला आहे.

पुस्तिकेचे प्रकाशन राज्याचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे व अन्य नेत्यांच्या उपस्थितीत  करण्यात आले. मोदींच्या पाच वर्षांच्या अदूरदर्शी कारभारामुळे विकासाचा डोलारा कोसळला आहे. नोटाबंदी करून ना भ्रष्टाचार कमी झाला ना काळा पैसा बाहेर आणला. उलट रांगेत उभे राहून शंभर निरपराध नागरिकांना हाकनाक प्राण गमवावे लागले. नोटाबंदी म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर असा हा तुघलकी निर्णय होता, अशी टीका केली आहे.

केंद्रातील मोदी सरकार कुणासाठी काम करते आहे, हे आता लपून राहिलेले नाही. आपल्या भांडवलदार मित्राचे हितसंबंध जपण्यासाठी मोदी कोणत्या थराला गेले, हे राफेल विमान खरेदी घोटाळ्याने जगासमोर आले आहे, आपला चौकीदार हा भांडवलदारांचा तारणहार आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे.