अमेरिकेची नासा ही अवकाश संशोधन संस्था २०२० मध्ये मंगळावर लहान हेलिकॉप्टर पाठवणार असून ते निर्मनुष्य ड्रोन सारखे असणार आहे. मंगळाच्या संशोधनासाठी त्याचा उपयोग होणार आहे.

दी मार्स हेलिकॉप्टर असे या उपकरणाचे नाव असून त्याचे वजन चार पौंड म्हणजे १.८ किलो आहे. त्याचा मुख्य भाग सॉफ्टबॉलच्या आकाराचा आहे. हेलिकॉप्टर मार्स २०२० रोव्हर गाडीला लावले जाणार आहे. रोव्हर गाडी मंगळावरील वातावरण वसाहतीस योग्य आहे की नाही याचा अंदाज  घेईल. तेथील नैसर्गिक साधनसंपत्ती व पूर्वीच्या सजीवसृष्टीचे पुरावे, मानवाला तेथे असलेले संभाव्य धोके यांचाही अभ्यास यात केला जाणार आहे. मार्स २०२० मोहीम जुलै २०२० मध्ये आयोजित करण्यात आली असून  फेब्रुवारी २०२१ मध्ये रोव्हर गाडी हेलिकॉप्टरसह मंगळावर पोहोचेल. नासाने अवकाश इतिहासात अनेक गोष्टी प्रथम करण्याचा मान मिळवला आहे, त्यात मंगळावर हेलिकॉप्टर पाठवण्याचा उपक्रमही समाविष्ट आहे, असे नासाचे प्रशासक जिम ब्रिडनस्टाइन यांनी सांगितले. मंगळाच्या आकाशात हेलिकॉप्टर उडवणे ही वेगळीच संकल्पना आहे, कुठल्याही देशाने अजून मंगळावर हेलिकॉप्टर उडवलेले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.