एकीकडे नेपाळमधील नागरिक ५०० व १००० रूपयांच्या नोटा कशा बदलाव्यात याच्या चिंतेत आहेत. तर दुसरीकडे नेपाळच्या केंद्रीय बँकेने गुरूवारी भारतातील नव्या ५०० आणि २००० रूपयांच्या नोटांवर बंदी घातली आहे. जोपर्यंत भारतीय रिझर्व्ह बँक फॉरेन एक्सचेंजतंर्गत नवीन अधिसूचना जारी करत नाही. तोपर्यंत भारतीय नोट बदलता येणार नाही, असे राष्ट्रीय बँकेने म्हटले आहे. अशा अधिसूचननेनंतरच विदेशी नागरिकांना भारतीय रूपये देण्याची परवानगी मिळते.
जोपर्यंत विनिमय अंतर्गत भारताकडून काही व्यवस्था केली जात नाही तोपर्यंत भारतीय नोटा बेकायदा मानले जाणार असल्याचे नेपाळ राष्ट्र बँकेचे रामू पोडेल यांनी विराटनगर येथील व्यापाऱ्यांना सांगितल्याचे वृत्त हिंदुस्थान टाइम्सने दिले आहे. रिझर्व्ह बँकेबरोबर झालेल्या समजोत्यानुसार एक नेपाळी नागरिक ५०० आणि १००० रूपयांच्या जुना नोटांच्या रूपात २५ हजार रूपये जवळ ठेऊ शकतो. आता या जुन्या नोटांचे काय होणार ? हे निश्चित झालेले नाही. अशा परिस्थिती बाजारात येत असलेल्या नवा भारतीय नोटा आम्ही कायदेशीर कसं मानू असा सवाल पोडेल यांनी उपस्थित केला आहे.

नेपाळमध्ये मोठ्याप्रमाणात भारतीय रूपयांचा व्यवहारात वापर केला जातो. अनेक नेपाळी नागरिक ५०० आणि १००० रूपयांच्या नोटा कशा बदलायच्या चिंतेत आहेत. दोन्ही देशात खुली सीमा असल्याने नवीन नोटाही नेपाळमध्ये पोहोचल्या आहेत. नेपाळ आणि भारतादरम्यान नेपाळी नागरिकांकडे किती भारतीय पैसे असावेत हे निश्चित झालेले नाही. दोन्ही बँका हा प्रश्न लवकरात लवकर मिटण्यासाठी एकमेकांच्या संपर्कात असल्याचे पोडेल यांनी सांगितले.
नेपाळच्या राष्ट्रीय बँकेने जुन्या भारतीय नोटा बदलण्याची नियमावली तयार करण्यासाठी एका विशेष समितीचे नेमणूक केली आहे. यातील काही नियमांची काठमांडूतील भारतीय दुतावासाला सोपवण्यात आली आहे.

तत्पूर्वी, केंद्र सरकारने ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या घेतलेल्या निर्णयाचा नेपाळवरही परिणाम झाला. भारताच्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद करण्यात आल्याने नेपाळमधील बँकिंग क्षेत्राने ३.५ कोटींचे भारतीय चलन रोखण्याचा निर्णय घेतला होता.
भारतात बंद करण्यात आलेल्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटांचे अंदाजे ३.५ कोटींचे चलन रोखण्यात आल्याची सूचना बँकांनी दिली होती. अन्य बँकांकडूनही याबाबत अहवाल आल्यानंतर बंद करण्यात आलेल्या नोटांची एकूण रक्कम चार कोटी रुपये होऊ शकते, असा अंदाजही व्यक्त केला जात होता.